पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यातच पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात असून, महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप केला जात आहे. जलवाहिनीमधून होत असलेली पाणीगळती थांबविण्यासाठी दुरुस्तीची कामे महापालिकेकडून केली जात असल्याने अशा कामांवेळी संबंधित भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा यासह सहकारनगर, पर्वती या भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्रातून सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. गेले महिना ते दीड महिन्यापासून कात्रज गावठाण, सुखसागरनगर, कोंढवा, राजस सोसायटी या परिसरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहत आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून दर मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. धरणात पुरेसे पाणी शिल्लक असताना महापालिकेकडून मात्र पाणीपुरवठा करण्यास अडचणी का येत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
गेल्या आठवड्यात कात्रज परिसरातील आगम मंदिर येथे मुख्य जलवाहिनीतून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने १७ एप्रिलला काम हाती घेतले होते. त्यामुळे भारती विद्यापीठ, सावंत विहार, वंडर सिटी, कदम प्लाझा, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी रोड, तसेच आजूबाजूच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
आंबेगाव पठार येथील प्रभाग क्रमांक १६ मध्ये महापालिकेचे पाणी येत नसल्याने महिला वर्गामध्ये प्रचंड रोष आहे. या भागातील महिलांनी गेल्या आठवड्यात महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन या भागातील महिलांनी पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्याची दखल घेऊन आयुक्त भोसले यांनी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. मात्र, यामध्ये अद्यापही फारशी सुधारणा झाली नसल्याची तक्रार केली जात आहे. प्रभाग क्रमांक ३१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जीएसआर टाकीची मुख्य वाहिनी समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना गळती झाली. त्यामुळे मंगळवारी वारजे भागातील ब्रह्मचैतन्य सोसायटी, नवचैतन्य सोसायटी, आनंद कॉलनी, इंगळेनगर आदी भागांत पाणी आले नाही.
धायरी परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील पाणीपुरवठा उद्या (गुरुवारी) २४ एप्रिलला बंद ठेवला जाणार आहे. जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची गळती होत आहे. ही गळती थांबविणे, तसेच या परिसरात असलेल्या पारे कंपनी रस्ता येथे स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. गणेशनगर, लिमयेनगर, गारमळा, गोसावी वस्ती, बरांगणी मळा, दळवीवाडी, कांबळेवस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार आणि आजूबाजूच्या परिसरातील पाणी बंद राहणार आहे.
आंबेगाव पठार परिसरात गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेचा कर भरत असतानाही पाण्यासाठी टँकरवर खर्च करावा लागत आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल.सुरेखा कदम पाटील, शिवसेना, पदाधिकारी
काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याच्या काही अडचणी होत्या. मात्र, या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. काही किरकोळ भाग वगळता कोठेही सध्या पाणी देण्यास अडचणी येत नाहीत. ज्या ठिकाणी तक्रारी असतील त्या विशिष्ट भागांची माहिती दिल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका