पुणे : खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाल्यानंतर मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यात आल्यानंतर मुठा नदीला पूर आला. मुठा नदीचा पूर पाहण्यासाठी शहरातील विविध पुलांवर नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. गर्दीचे नियोजन, तसेच दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध पुलांच्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
गेल्या वर्षी शहरात पाऊस कमी झाला होता. त्यामुळे मुठा नदीला पूर आला नव्हता. गेल्या वर्षी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, मुठा नदी दुथडी भरून वाहिली नव्हती. आठवडभरापासून शहर परिसरात पाऊस सुरू आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीनंतर पाणी पातळीत वाढ झाली. सकाळी महापालिका भवनजवळील जयंतराव टिळक पूल, तसेच भिडे पूल वाहतुकीस बंद करण्यात आले. प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी जाहीर केली. गुरुवारी दुपारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यानंतर अनेकांनी सहकुटुंब मुठा नदीचा पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचा…Pune Rain Update : भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीस बंद
शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, डेक्कन जिमखाना भागातील छत्रपती संभाजी पूल, छत्रपती शिवाजी पूल, कसाबा पेटेतील डेंगळे पूल, म्हात्रे पूल, येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू, तसेच येरवड्यातील जुना पूल परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी सहकुटुंब मुठा नदीचा पूर पाहण्याचा आनंद घेतला. दिवसभर शहरातील विविध पुलांवर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पुलाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. गर्दीचे नियोजन, तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी बंदोबस्त तैनात केला.
मेट्रोतून पूरदर्शन
पुलांवर गर्दी झाल्याने अनेकांनी मेट्रोतून प्रवास केला. वनाज ते रामवाडी मार्गिकेवरील गाडीतून प्रवास करून अनेकांनी पूरदर्शनाचा आनंद लूटला. काहीजणांनी खास पूर पाहण्यासाठी मेट्रोतून प्रवास केला.