पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला नागरिकांचा ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील ही यात्रा पुणे शहरातील वडगावशेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली आहे. त्या यात्रेदरम्यान वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांशी अजित पवार यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – महापालिका भवन परिसरात तरुणाला धमकावून सोनसाखळी चोरी
हेही वाचा – पुणे : वैमनस्यातून अल्पवयीनावर कोयत्याने वार
आमच्या भागात भटक्या कुत्र्यामुळे लहान मुले आणि नागरिकांना रस्त्यावरून चालने कठीण झाले आहे. अनेक मुलांना आणि नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिका आणि वॉर्ड अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. तसेच आमच्या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे. यासह अनेक समस्यांचा पाढा वडगावशेरी भागातील नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर वाचून दाखविला. त्यावर अजित पवार यांनी सर्व नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना फोन लावला. या भागातील आमदार सुनील टिंगरे आणि नागरिकांची बैठक घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे, असा आदेश अजित पवारांनी महापालिका आयुक्तांना दिला.