पुणे : नांदेड सिटी परिसरातून बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले. बेपत्ता मुलगी रांजणगाव येथील महागणपती मंदिरात सापडल्यानंतर पोलिसांना तपासात मदत करून मुलीची माहिती देणाऱ्या पाचजणांना पोलीस आयुक्तांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड सिटी परिसरातून १२ वर्षीय मुलगी गुरुवारी (१८ एप्रिल) बेपत्ता झाली होती. शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी मुलीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरले. मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना एक लाख रुपयांचे बक्षीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले. बेपत्ता झालेल्या मुलीने नगर रस्त्यावरील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे वडापाव खाला. त्यानंतर ती नगर रस्त्याने पायी चालत पुढे गेल्याची माहिती तपासात मिळाली.

हेही वाचा – राज्य, केंद्रीय, खासगी विद्यापीठांची एआयसीटीईच्या मान्यतेपासून सुटका… झाले काय?

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी समाजमाध्यमात संदेश प्रसारित केला होता, तसेच मुलीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. युवराज वानखेडे यांनी संबंधित संदेश पाहिला होता. रांजणगाव परिसरातील महागणपती मंदिरात मुलगी असल्याची माहिती वानखेडे यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मुलगी मंदिरात सापडली. मुलीला आणण्यासाठी पोलीस आयुक्त तेथे गेले होते. मुलीचा शोध घेण्यासाठी सिंहगड रस्ता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवा पासलकर, शरद घोडके, केसनंदमधील महाराष्ट्र वडापावचे मालक संभाजी अशोक सातव, युवराज वानखेडे, संजय पाटीलबुवा गाडे यांनी पोलिसांना मदत केली.

हेही वाचा – गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा

पोलीस आयुक्तालयात पासलकर, घोडके, सातव, वानखेडे, गाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना विभागून एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune citizens who provide information about the missing school girl are rewarded by the police commissioner pune print news rbk 25 ssb
Show comments