दिवाळी हा प्रकाशाचा सण. यामुळे या सणाला सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. या सणाच्या निमित्ताने सर्वांचे आयुष्य प्रकाशमान होत असते. मात्र, दिव्यांनी प्रकाशमान होणारा हा उत्सव आता फटाक्यांच्या विषारी विळख्यात अडकला आहे. दिवाळीच्या काळात तेजाने दिपणारे दिवे दिसण्याऐवजी आता डोळे आणि कानांना न मानवणारे फटाके फुटू लागले आहेत. यामुळे क्षणार्धात आसमंत उजळून जात असला तरी त्यापासून होणारे हवा आणि ध्वनिप्रदूषण हे नित्याचीच बाब बनले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवा प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंदा बारकाईने लक्ष ठेवले. दिवाळीच्या आधी २४ ऑक्टोबर आणि दिवाळीत १ नोव्हेंबर या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १२ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली. त्यातून नेहमी होणारे ध्वनिप्रदूषण आणि दिवाळीच्या काळातील ध्वनिप्रदूषण याची तुलनात्मक आकडेवारी समोर आली. नियमानुसार, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल, रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबल असणे अपेक्षित असते. मात्र ही ध्वनिमर्यादा पाळली गेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

शिवाजीनगरमधील साखर संकुल परिसरात दिवाळीच्या काळात दिवसा आवाजाची पातळी ७ डेसिबलने वाढून ७९ डेसिबलवर पोहोचली. याचवेळी रात्रीची आवाजाची पातळी सुमारे ११ डेसिबलने वाढून ७४ डेसिबलवर पोहोचली. नळ स्टॉप परिसरात दिवसा ही पातळी वाढली नाही मात्र, रात्री ५ डेसिबलने वाढून ७० डेसिबलवर पोहोचली. सातारा रस्त्यावर सिटी प्राईड परिसरात आवाजाची पातळी दिवसा ७ डेसिबलने वाढून ८२ डेसिबल आणि रात्री १० डेसिबलने वाढून ७५ डेसिबल झाली. स्वारगेट परिसरात दिवसाची आवाज पातळी वाढली नाही मात्र रात्रीची पातळी ६ डेसिबलने वाढून ७२ डेसिबलवर गेली. शनिवारवाडा परिसरात आवाज पातळी दिवसा २ डेसिबलने वाढून ७७ डेसिबल आणि रात्री ११ डेसिबलने वाढून ७५ डेसिबलवर पोहोचली. लक्ष्मी रस्त्यावर आवाजाची पातळी दिवसा ६ डेसिबलने वाढून ८३ डेसिबल आणि रात्री १० डेसिबलने वाढून ७५ डेसिबलवर पोहोचली. यामुळे दिवाळीच्या काळात आवाजाची पातळी सुमारे ५ ते १० डेसिबलने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस

मागील काही काळापासून हवा प्रदूषणासोबतच ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. दोन्ही शहरांचा विस्तार सुरू असून, अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे मोठी धूळ निर्माण होऊन हवा प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानेही हवा प्रदूषणात भर पडत आहे. वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आवाजानेही ध्वनिप्रदूषण वाढत आहे. याचबरोबर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यात येत असल्यानेही ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. हवा आणि ध्वनिप्रदूषण आधीच वाढलेले असताना दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे त्यात आणखी भर पडते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेची पातळी विषारी बनते. याचवेळी त्यांच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो. सातत्याने मोठा आवाज कानावर पडल्याने बहिरेपणाचा धोका निर्माण होतो. आपण हे प्रदूषण रोखण्यासाठी खरेच प्रयत्न करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्यथा म्हणावे लागेल, नेमेचि येते आवाजाची दिवाळी!

sanjay.jadhav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city air pollution and noise pollution during diwali 2024 pune print news stj 05 css