पुणे : शहर आणि उपनगरात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. शहरात ऑगस्ट महिन्यात सरासरी १४२.९ मिमी पाऊस पडतो. यंदा ३० ऑगस्टपर्यंत ३०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०१३ पासून आजवरचा हा उच्चांकी पाऊस आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि उपनगरात चालू महिन्यात ३० ऑगस्टपर्यंत ३०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात शहरात सरासरी १४२.९ मिमी पाऊस पडतो. यंदा दुपटीहून जास्त पाऊस झाला आहे. २०१३ ते २०२४ या काळातील ऑगस्ट महिन्यात झालेला हा उच्चांकी पाऊस आहे. २०१४ च्या ऑगस्टमध्ये २८०.६ मिमी, २०१६ च्या ऑगस्टमध्ये २३०.५ मिमी, २०१९ च्या ऑगस्टमध्ये २०९.४ मिमी आणि २०२० च्या ऑगस्टमध्ये २५५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>> प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
यंदा पावसाचा जोर जास्त आहे. शहरात जूनमध्ये सरासरी १६६.३ मिमी, जुलैमध्ये १८०.१ मिमी आणि ऑगस्टमध्ये सरासरी १४२.९ मिमी असा एकूण सरासरी ४८९.३ मिमी पाऊस पडतो. यंदा याच काळात एकूण ९१९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये २५२ मिमी, जुलैमध्ये ३६४.७ मिमी आणि ३० ऑगस्टपर्यंत ३०३ मिमी असा एकूण ९१९.७ मिमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यांत मोसमी पावसाला पोषक स्थिती मिळाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सतत निर्माण होत राहिले. राज्याच्या किनारपट्टीवरही बहुतांश काळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहिला. त्यामुळे पुणे शहरात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd