निवडणुकीच्या राजकारणात रस घेणारे पुणेकर हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडत नसल्याने मतटक्का हा कायम कमी होत आला आहे. पुण्यातील मतदारांची ही सवय जुनी आहे. अगदी पुणे ही नगरपालिका असल्यापासून काही अपवाद वगळता सरासरी ५० ते ५५ टक्केच मतदार मतदानाचा हक्क बजावत आले आहेत. महापालिका झाल्यानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभेलाही मतदानाचे प्रमाण हे कमीच राहिले आहे. त्यामुळे पुण्यावर ‘कमी मतदान करणारे शहर’ हा शिक्का बसला आहे. याची दखल यंदा निवडणूक आयोगानेही घेतली. हा शिक्का पुसण्याची हीच वेळ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुण्यात राजकीय पक्षांमध्ये अटीतटीची लढत असते, तेव्हाच मतदान हे ६० टक्क्यांहून अधिक झालेले दिसते. अन्य निवडणुकांमध्ये ५० ते ५५ टक्क्यांपर्यंतच मतदान होत आले आहे. पुणे ही नगरपालिका असताना प्रामुख्याने १९२२ आणि १९२५ या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण हे अनुकमे ६५.०३ आणि ६७.०८ टक्के झाले होते. यामागचे कारण म्हणजे या दोन्ही निवडणुकांच्या वेळी काँग्रेस, हिंदुसभा आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्यात मोठ्या प्रमाणात चुरस होती. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडले होते. १९३८ हे वर्षही निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या निवडणुकीत ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामागचे कारण स्पष्ट होते. काँग्रेसने पहिल्यांदा पक्ष म्हणून नगरपालिकेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचा प्रचारावर जोर होता. तसेच ‘नागरी संघटना’ हा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध् नागरी संघटना अशी सरळ लढत होती. त्यामुळे मतदानाचे प्रमाण हे ६६ टक्क्यांवर पोहोचले होते. महापालिका स्थापन झाल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काही अपवादवगळता ५५ ते ६० टक्के मतदान झालेले दिसते.
विधानसभा निवडणुकांमध्ये प्रारंभीच्या काळात पुण्यात मतदानाचे प्रमाण हे जास्त होते. मात्र, कालांतराने हे प्रमाण कमी होत गेले. १९५१ मध्ये झालेल्या निवडणुकीत उत्तर-पश्चिम, दक्षिण-पूर्व, दक्षिण पश्चिम आणि पुणे शहर मध्य असे चार मतदारसंघ होते. तेव्हा पुणे जिल्ह्यातील हे मतदारसंघ तत्कालीन मुंबई राज्यामध्ये समाविष्ट होते. त्या वेळी मतदान हे सरासरी ५० ते ५५ टक्केच झाले होते. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही हे मतदारसंघ मुंबई राज्यातच होते. मात्र, त्या वेळच्या निवडणुकीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे भरघोस मतदान झाले होते. त्या वेळी कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शुक्रवार पेठ हे चार मतदारसंघ होते. त्यांपैकी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ६५ टक्के, तर अन्य मतदारसंघांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर झालेल्या १९६२ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ५३ टक्के, तर अन्य मतदारसंघांमध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. १९६७ च्या निवडणुकीत मतदारसंघांची पहिल्यांदा फेररचना करण्यात आली. भवानी पेठ या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीपासून मतदारांचा उत्साह ओसरण्यास सुरुवात झालेली दिसते. १९७२ मध्ये सरासरी ६० ते ६५ टक्के मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. शुक्रवार पेठ या नावाचा मतदारसंघ राहिला नाही. बोपोडी आणि पर्वती या दोन नवीन मतदारसंघांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि भवानी पेठ हे पारंपरिक मतदारसंघ होते. त्यामुळे सहा मतदारसंघ झाले. त्या वर्षीही सरासरी ६० ते ६५ टक्के मतदान झाले.
पुण्यात १९८० पासून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीला उतरती कळा लागली. या निवडणुकीत जेमतेम ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९८५ आणि १९९० मध्येही हे प्रमाण सरासरी तेवढेच राहिले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण जास्त होते. तेव्हा सरासरी ६५ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी राज्यात सत्ताबदल होऊन भाजप-शिवसेना युती सत्तेत आली होती. १९९९ च्या निवडणुकीत मतदानाची हीच स्थिती होती. २००४ ची विधानसभा निवडणूक ही मतदानासाठी निरुत्साही ठरली. कसबा मतदारसंघवगळता सर्व मतदारसंघांत मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते.
मतदारसंघांची २००९ मध्ये तिसऱ्यांदा पुनर्रचना झाली. तेव्हा भवानी पेठ हा मतदारसंघ राहिला नाही. वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला हे तीन नवीन मतदारसंघ झाले. शिवाजीनगर मतदारसंघाचे विभाजन करून कोथरुड हा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला. पर्वती, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे तीन पारपंरिक मतदारसंघ कायम राहिले. तरीही मतदानाच्या टक्केवारीत फरक पडला नाही. तेव्हा पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात तर आजवरचे नीचांकी म्हणजे अवघे ३५.९३ टक्के मतदान झाले होते. अन्य ठिकाणीही कमी प्रतिसाद मिळाल्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली होती. २००४ पासून २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये निम्मे पुणेकर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नसल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये सुमारे ५५ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर अवघ्या ४७.८७ टक्के मतदारांनी मतदान केले.
लोकसभा निवडणुकीतही पुण्यात मतदानाची हीच स्थिती राहिली आहे. प्रारंभीच्या निवडणुकांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मतदान झालेले दिसते. १९९१ च्या निवडणुकीनंतर हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. २००९ मधील निवडणुकीत तर ४० टक्केच मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीतही ५१ टक्के मतदारांनी मतदान केल्याने कमी मतदान करणारे शहर म्हणून पुण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. हा शिक्का आज पुसण्याची पुणेकरांना संधी आहे.
sujit. tambade@expressindia. com