पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. मोदी यांच्या लोकशाही विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस सतत्याने लढा देत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याने मोदी यांना पुरस्कार देणे योग्य नाही, असा आक्षेप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबतची जाहीर नाराजी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर असल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मात्र, काँग्रेसने मोदी यांना पुरस्कार देण्यास आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणाविरोधात लढा देत आहेत. रोहित टिळक काँग्रेसचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केल्याने शहरातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्याबाबतची नाराजी शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची जाहीर नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतल्यामुळे या पुरस्कार प्रदान सोहळ्यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.