पुणे: ‘स्वतःला हिंदू म्हणविणारे हिंसा करीत आहेत’, अशा प्रकारचे विधान काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना केले होते. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला असून त्याचे पडसाद पुण्यात देखील उमटले आहेत. ‘खबरदार हिंदू धर्माला नाव ठेवाल तर समुद्रात फेकून देईल – स्वामी विवेकानंद’ अशा आशयाचे फ्लेक्स भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरातील अनेक ठिकाणी लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याबाबत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप शहराध्यक्ष स्वतः पोलिस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचं (धीरज घाटे) वागणं काय आहे, याबद्दल त्याला विचारुन बघा, तो एकटा फिरू शकतो का? फिरू शकत नाही.

हेही वाचा : संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर टीका, पुण्यात मस्त ग्रुप – त्रस्त ग्रुपच्या बॅनरची चर्चा

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे धीरज घाटे यांना उद्देशून पुढे म्हणाले, तू कधी मरशील हे तुला माहिती नाही. कारण तुझे कर्म तसे आहेत. त्यामुळे पोलीस संरक्षणात तुला फिरावं लागतं आणि त्यामुळे जी कर्म कराल ते भोगावं लागतं अशा प्रकारचे अरविंद शिंदे यांनी विधान केल्याने नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन समोर येऊन निषेध आंदोलन करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस भवन परिसरात चोख पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

विधानाच्या निषेधार्थ सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मिळाल्याने काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी काँग्रेस भवन येथे होते.तर दुसर्‍या बाजूला भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, पुनीत जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिर चौकापासून काँग्रेस भवनच्या दिशेने चालत निघाले. त्यावेळी पोलिसांनी १०० फुट अंतरावर सर्व आंदोलनकर्त्यांना रोखून ठेवले.

हेही वाचा : भूशी डॅम परिसरात छोट्या व्यावसयिकांवरील कारवाईमुळे आमदार शेळके संतापले, म्हणाले ” सरकार गेलं… “

त्यावर आंदोलनकर्ते अधिक आक्रमक होत ठिय्या आंदोलन सुरू केले आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविला. तसेच अरविंद शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.त्यावेळी आंदोलनातील काही कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावर पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city congress president arvind shinde threats bjp city president dheeraj ghate svk 88 css