कोथरूडमधील उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांची बिहारमधील चोरट्यांनी हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. झारखंडमधील खाणीत क्रशर अडकला असून, तो बाहेर काढण्यासाठी तातडीने बिहारमध्ये यावे लागेल. त्यासाठी मोठी रक्कम देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवले. कोल इंडिया लिमिटेडच्या नावाने बनावट ई-मेल तयार करून चोरट्यांनी त्यांना संदेश पाठविला होता. चोरट्यांच्या जाळ्यात शिंदे सापडले. या घटनेने अनेक प्रश्नही उपस्थित झाले असून, सायबर गुन्हेगारीची आणखी काळी बाजू उजेडात आली आहे.

शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मारुळी गावचे रहिवासी. पुण्यात ते अभियांत्रिकी शिक्षणासाठी आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी १९९३ मध्ये धातूशास्त्र विषयात पदवी मिळवली. याच विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला नोकरी केली. त्यानंतर पै-पै साठवून सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर परिसरात रत्नदीप कास्टिंग हा कारखाना सुरू केला. या व्यवसायात त्यांनी स्वत:चा दबादबा निर्माण केला. परराज्यातील कामेही त्यांना मिळाली.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना एक ई-मेल आली. ‘झारखंडमधील खाणीत जमिनीपासून १२०० फूट खोलीवर एक क्रशर अडकला असून, तो बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कोल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांना तुम्हाला भेटायचे आहे,’ असे त्यात म्हटले होते. कोल इंडिया लिमिटेडच्या नावाचा वापर करून हा बनावट ई-मेल तयार केला गेला होता. शिंदे यांनी चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवला. ते ११ एप्रिल रोजी बिहारला निघाले. पत्नी आाणि मुलाने त्यांना जाऊ नका, असे सांगितले होते. मात्र, व्यावसायिक कामासाठी दिलेला शब्द पाळायला हवा, असे सांगून ते घरातून बाहेर पडले. विमानाने ते पाटण्याकडे रवाना झाले.

पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ते नेहमीच कुटुंबीयांच्या संपर्कात राहत. मात्र, बिहारला पोहोचल्यानंतर काही तरी अघटित घडेल, अशी पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. विमानतळावर पोहोचल्यानंतर शिंदे यांनी पत्नीशी साधलेला संपर्क शेवटचा ठरला. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. तोडक्यामोडक्या भाषेत शिंदे यांच्या कुटुंबीयांना संदेश पाठविण्यात आले, तेव्हा कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शिवराज सागी नावाच्या एका व्यक्तीबरोबर असल्याचे यात सांगितले होते. सागीचा मोबाइल क्रमांक पाठविण्यात आला होता. पण, तो बंद होता.

शिंदे बेपत्ता झाल्यानंतर कोथरूड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. कोथरूड पोलिसांचे पथक आणि शिंदे यांचे नातेवाइक पाटण्याकडे रवाना झाले. पाटणा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पाटणा विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा मोटार नालंदा जिल्ह्यातील शिवराज सागी (वय ३७) याच्या नावावर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शिंदे यांचा मृतदेह १३ एप्रिल रोजी पाटण्याजवळ जेहानाबाद परिसरात सापडला.

पाटण्याचे पोलीस अधीक्षक अवकाश कुमार, स्वीटी शेरावत, अनु कुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शर्मा आणि पथकाने या प्रकरणाचा तपास करून सागी याच्यासह सहा जणांना अटक केली. आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या टोळीने राजस्थानसह गुजरातमधील व्यावसायिकांना बिहारमध्ये बोलावून त्यांना लुटल्याचे तपासात उघडकीस आले.

या टोळीचा म्होरक्या शिवराज सागी याचा कास्टिंगचा व्यवसाय होता. करोना संसर्ग काळात व्यवसायात तोटा झाला. त्यानंतर त्याने या क्षेत्रातील उद्योजकांना जाळ्यात ओढून लुटण्याचे प्रकार सुरू केले. संकेतस्थळावरून त्यांनी कोथरूडमधील उद्योजक शिंदे यांची माहिती घेतली होती. शिंदे पाटणा विमानातळावर उतरल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या बँक खात्यातून ९० हजार रुपये चोरट्यांनी काढून घेतले. शिंदे यांनी चोरट्यांना विरोध केल्याने बेदम मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, सोनसाखळी असा बारा तोळ्यांचा ऐवज, मनगटी घड्याळ, मोबाइल संचही चोरीला गेला.

सायबर चोरटे किती विविध प्रकारे फसवणूक करत आहेत, त्याची ही उघडकीस आलेली नवी बाजू सुन्न करणारी आहे. अशा प्रकारे लुटण्याचे वाढलेले प्रकार आणि त्यात उच्चशिक्षितही अडकत असल्याची बाब चिंतेत टाकणारी आहे. अखंड सावधानतेला पर्याय नाही, असेच या घटना सांगत आहेत. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या एका मराठी उद्योजकाची परराज्यात झालेली हत्या मनाला चटका लावणारी आहे.
rahul.khaladkar@expressindia.com