पुणे : शहरात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. वारजे भागातील एका मंडप साहित्याच्या गोदमाला आग लागली. गोदामातील आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचा जवान किरकोळ जखमी झाला, तसेच कात्रज भागातील एका प्लायवुडच्या गोदामास आग लागली. अग्निशमन दल, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जवानांनी आग आटाेक्यात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वारजे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात असलेल्या मंडप साहित्याच्या गोदामास पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडप साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणताना वारजे अग्निशमण केंद्रातील जवान अक्षय गायकवाड यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – …अन् ‘सारथी’ पुन्हा साथीला!

कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात एका प्लायवुडच्या गोदामास आग लागल्याची माहिती पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, धर्म सोडून वागल्यास सृष्टी…

कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात एका इमारतीत मंगळवारी दुपारी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या तीन वर्षांच्या बालकासह पाच महिलांची सुटका केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city fire incident warje katraj kondhwa pune print news ssb rbk 25 ssb