पुणे : शहरात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ महिलांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. गजबजलेल्या भवानी पेठ, एरंडवणे, वारजे, चतु:शृंगी भागात दागिने चोरीच्या घटना घडल्या. भवानी पेठेतील लोखंड बाजारात पादचारी महिलेकडील दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेले. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर चौकात राहायला आहेत. शनिवारी (१५ फेब्रुवारी) त्या रात्री साडेनऊच्या सुमारास महिला आणि त्यांचे पती भवानी पेठेतील लोखंड बाजारातून निघाले होते. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार तपास करत आहेत.
एरंडवणे भागातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना रविवारी (१६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहायला आहेत. त्या एरंडवणे भागातील सेवासदन शाळेसमोर रात्री आठच्या सुमारास रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करत आहेत.
वारजे भागात अतुलनगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वारजे भागात राहायला आहेत. त्या रविवारी सायंकाळी अतुलनगर परिसरातील सेवा रस्त्यावर पतीसोबत रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.
ओैंध भागात क्वीन्स टाॅवर सोसायटीच्या परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार क्वीन्स टाॅवर सोसायटीत राहायला आहेत. त्यांची आई सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सोसायटीच्या परिसरात थांबली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.
डीपी रस्त्यावर लूटमार
एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शनिवार पेठेत राहायला आहे. ९ फेब्रुवारी रोजी तो सकाळी पाचच्या सुमारास तो डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता. त्या वेळी दुचाकीस्वार चाेरट्यांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.