शहरातील रस्त्यांची चाळण होण्यास ३३ ठेकेदार जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) रस्त्यांची दुरवस्था झाल्यापैकी ७५ ठेकेदारांना नोटिस बजाविण्यात आल्या असून यातील ३३ ठेकेदारांनी पाचपेक्षा जास्त रस्त्यांची कामे केल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. मात्र या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे : मासेमारीसाठीच्या ठेक्यांमध्ये स्थानिक सहकारी संस्थांना प्राधान्य ; मत्स्य व्यवसाय विभागाचा निर्णय

पावसाळ्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे पुढे आले. रस्त्याचे काम केल्यानंतर तीन वर्षे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असतानाही रस्त्यांवर खड्डे पडले होते. महापालिकेच्या मुख्य पथ विभागाकडे १३९ रस्ते देखभाल दुरुस्ती दायित्व असलेले आहेत. या रस्त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार प्रति खड्डा पाच हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडूनही देखभाल दुरुस्ती दायित्व असलेल्या ठेकेदारांची यादी पथ विभागाला दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान ; २० हजार कोंबड्या मृत; ८३ घरांची पडझड

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून बारा मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जातात. तर बारा मीटर रुंदीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते मुख्य पथ विभागाकडून केले जातात. यामध्ये रस्ते विकसन, देखभाल दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली. प्रमुख रस्त्यांसह बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर लहान-मोठे शेकडो खड्डे पडल्याची वस्तुस्थिती समोर आली. यामध्ये देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांचाही समावेश होता. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असतानाही रस्त्यांवर खड्डे पडल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांविरोधात दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यातील ३३ ठेकेदारांनी शहरातील रस्त्यांची बहुतांश कामे केल्याची माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दायित्व असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याप्रकरणी प्रति खड्डा पाच हजार रुपये ठेकेदाराकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पथ विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.पावसाळा सुरू होताच शहरातील रस्त्यांची चाळण झाली. दोन-चार महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले. तसेच देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीतील रस्ते उखडले. त्यामुळे या निकृष्ट कामामुळे पथ विभागावर टीका सुरू झाली. महापालिकेने या रस्त्यांची त्रयस्थ संस्थेद्वारे तपासणी करून दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव ठेवला. त्यानुसार १३९ रस्त्यांपैकी केवळ पाच कामांसाठी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मेट्रोला दंड
मध्यवर्ती व उपनगरांमधील भागात मलवाहिनी टाकल्यानंतर व्यवस्थित दबाई न करता रस्ते बुजविल्याने खड्डे पडले, त्यासाठी वारंवार रस्ते दुरुस्तीचे काम करावे लागेल तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. संबंधित ठेकेदाराला या विभागाने फक्त ४० हजार रुपयांचा दंड केला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून समान पाणीपुरवठा योजनेचे काम ठेकेदाराने व्यवस्थित न केल्याने १४ लाख ५० हजार रुपये दंड केला आहे. महापालिकेच्या पथ, पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागाकडून ठेकेदारांवर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रोने रस्ते खोदाई केल्याप्रकरणी त्यांना ३६ लाखांचा दंड करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका प्रशानसाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city in pit due to 33 contractors pune print news amy