पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. उपलब्ध रस्ते, वहनक्षमता विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहतुकीचा वेग १०.५ टक्क्यांनी वाढला असून, वाहतूक पोलिसांनी महापालिका, तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी शहरातील बहुतांश रस्त्यांवरून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहेत. वर्दळीच्या चौकात रस्ता ओलांडणे हे जिकिरीचे ठरत आहे. अतिवेगामुळे शहरात गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्ते अपघातात पुणे शहरात किमान एकाचा मृत्यू होत आहे. वाहतुकीचा वेग वाढविण्याबरोबरच पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवल्यास जरब बसेल, तसेच वाहतुकीला शिस्त लागेल.
कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका एकत्रित काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांवर विविध उपाययोजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांचा देखील आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या. २६५ किलोमीटरच्या एकूण ३३ प्रमुख रस्त्यांची निश्चिती करून या रस्त्यांच्या सुधारणेसाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये वाहतूक अभियांत्रिकी बदल, प्रमुख रस्त्यांवरील वळणे (राइट वा लेफ्ट टर्न) बंद करणे, तसेच ज्या भागात कोंडी होते, असे भाग निश्चित करून तेथील कोंडी हटविण्यासाठी अभियांत्रिकी बदल करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे पीएमपी थांबे हलविणे, खासगी बस, तसेच रिक्षा थांबे हलविण्यात आल्याने वाहतुकीचा वेग वाढला.
प्रमुख रस्त्यांवरील कोंडी होण्याची कारणे वाहतूक पोलिसांनी शोधली आहेत. यांमध्ये काही वेळा अचानक वाहने रस्त्यावर आल्याने कोंडी होते; तसेच काही वेळा नागरिकांच्या चुका, रस्त्यात वाहन बंद पडणे, चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसणे यांमुळे काेंडीत भर पडत असल्याचे लक्षात आले. ज्या भागात वाहतूककोंडी होते, अशा भागात वाहतूक नियोजन करणाऱ्या वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक कोंडी रस्त्यावर वाहन बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांत ११४ वेळा वाहन बंद पडल्याने संबंधित ठिकाणी कोंडी झाली. बेशिस्त पद्धतीने वाहन लावणे, चालविणे, खड्डे, अपघात, रस्त्यांची कामे, वेगवेगळे कार्यक्रम, तसेच सिग्नल बंद पडण्याच्या घटनांमुळे देखील कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा महत्त्वाची आहे. शहरातील प्रमुख चौकांत पादचाऱ्यांसाठी सिग्नल यंत्रणा नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक चौकातील सिग्नल यंत्रणेत पादचाऱ्यांसाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास त्वरित कार्यान्वित करण्यासाठी बॅटरी यंत्रणा (इन्व्हर्टर) लागते. शहरातील १६० सिग्नल यंत्रणेत इन्व्हर्टर यंत्रणा नसल्याचे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास प्रमुख चौकांतील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होते. त्यामुळे प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी इन्व्हर्टर यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ३०२ सिग्नल आहेत. त्यांपैकी १२४ हे अत्याधुनिक ‘एटीएमएस’ यंत्रणेने जोडले आहेत. उर्वरित १७८ पैकी १६० सिग्नलला इन्व्हर्टर नाही. महावितरणच्या वीजपुरवठ्यावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सिग्नल यंत्रणा बंद पडते. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर कोंडीत भर पडते.
पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे हे विविध यंत्रणांशी समन्वय साधून प्रयत्न करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे वाहतूक समस्या सुटणार नाही. त्यासाठी शासनाने वाहतूक पोलिसांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. मुंबईपेक्षा जास्त विस्तार असलेल्या पुण्यातील वाहतूक नियोजनाचे काम साधारणपणे ८०० ते ९०० पोलीस कर्मचारी करत आहेत. बेशिस्त वाहनचालकांकडून होणारा नियमभंग, पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना विचारात घेता वाहतूक पोलिसांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांनी काही चूक केल्यास किंवा त्यांच्या धोरणात विसंगती आढळून आल्यास सजग पुणेकरांनी वाहतूक पोलिसांना सूचनाही कराव्यात. केवळ टीकाटिप्पणी करण्यापेक्षा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन केल्यास वाहतूकविषयक बऱ्याच समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
rahul.khaladkar@expressindia.com