पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून, थंडीमुळे रात्रीबरोबर दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी होऊन कोरड्या हवामानामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सातत्याने तापमानात घट होत आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढत असल्याचे जाणवत आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत राहील. त्याचा प्रभाव प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, केरळ या राज्यांत जाणवण्याचा अंदाज आहे. तसेच या प्रणालीमुळे राज्यातील हवामान ढगाळ होण्याची शक्यता नाही. उलट, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि मध्य भारतातील हवेतील आर्द्रता कमी होऊ शकते. परिणामी, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह वाढून रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.