पुणे : देशातील इतर महानगरांच्या तुलनेत परवडणारे शहर म्हणून ओळख असलेले पुणे हे २०१९ च्या तुलनेत २०२३ या वर्षांत देशातील सर्वांत वेगाने वाढणारी बांधकाम क्षेत्र बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. घरांच्या विक्रीत देशभरातील प्रमुख ७ महानगरांना पुण्याने मागे टाकले आहे. याबरोबरच २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुणे बांधकाम क्षेत्र बाजारपेठेची वाढ ही ४५ टक्के असल्याचे ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३’ या अहवालातून समोर आले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३’ हा अहवाल जाहीर करण्यात आला. यावेळी २०२३ मधील पुणे शहरातील गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक विषयांवर चर्चा झाली. सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता व विदा विश्लेषक राहुल अजमेरा यांनी हा अहवाल सर्वांसमोर मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव अश्विन त्रिमल, जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, व्यवस्थापकीय समिती सदस्य पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा आणि कपिल त्रिमल आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे १०० हून अधिक सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
गेल्या वर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात एकूण ८९ हजार ३४७ घरांची विक्री झाली असून, इतर शहरांमध्ये ठाणे, कल्याण- डोंबिवली महापालिका, पालघरमध्ये एकत्रित ८५ हजार, बंगळूरूमध्ये ६३ हजार ९८०, दिल्लीमध्ये ६५ हजार ६२५, हैदराबादमध्ये ६१ हजार ७१५, मुंबईमध्ये ४४ हजार ५ आणि चेन्नईमध्ये २१ हजार ६३० घरांची विक्री झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा >>>… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३’ ठळक मुद्दे
– पुणे विभागात वर्षभरात ८९ हजार ३४७ घरांची विक्री
– २०१९ मध्ये २९ हजार कोटी रुपये असलेली गृहखरेदी २०२३ मध्ये ५७ हजार ४१२ कोटी रुपयांवर
– १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत मागील ५ वर्षांत चार पटीने वाढ
– ४५ टक्के गृहखरेदीदार २५ ते ३५ या वयोगटातील
– घरांची सरासरी किंमत ६४ लाख रुपये
– घरांचा आकार, किंमत वाढूनही परवडणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचे स्थान कायम
– बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, वाकड, म्हाळुंगे या परिसराचा बाजारपेठेतील हिस्सा तब्बल ६० टक्के
शिक्षण, वाहन उद्योग, माहिती- तंत्रज्ञान क्षेत्राचा पुण्यातील बांधकाम व्यवसायाला फायदा होत आहे. यासोबतच शहरातील पायाभूत सुविधा, नोकरीच्या अनेकविध संधी, शैक्षणिक संस्था, पूरक हवामान या गोष्टी देखील तरुण गृहखरेदीदारांना आकर्षित करीत आहेत.- रणजीत नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो