लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर परिसरातील शहर कार्यालयाचा करारनामा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने करण्यात आला आहे. जगताप हे शरद पवार गटात असल्याने शहर कार्यालयाचा ताबा घेणे अजित पवार गटासाठी अशक्य ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचीही शहरात दोन कार्यालये होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवार समर्थकांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय नव्याने उभारण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाचे कामकाज टिळक रस्त्यावरील हिराबागेजवळील गिरे बंगला येथून चालत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी पक्षाचे प्रशस्त कार्यालय शिवाजीनगर परिसरात उभारण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शहर कार्यालयाचा ताबा कोणाकडे यावरून वाद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे.

आणखी वाचा-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शरद पवार यांच्या बैठकीला रवाना

शहर कार्यालयाचा करार माझ्या नावाने आहे. शहराध्यक्ष म्हणून करार प्रशांत सुदामराव जगताप या नावाने करण्यात आला आहे. त्यामुळे अन्य कोणाला शहर कार्यालयाचा ताबा घेता येणार नाही. कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न अन्य कोणाकडून किंवा गटाकडून झाल्यास त्याविरोधात पोलीस तक्रार केली जाईल. पोलिसांत तक्रार करण्याचे अधिकार मला आहेत, असे प्रशांत जगताप यांनी शहर कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहर कार्यालयातील अजित पवार यांचे छायाचित्र हटविण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार अजित पवार यांचे छायाचित्र हटविण्याची कार्यवाही केली जाईल, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city ncp office doors remain closed for the ajit pawar group pune print news apk 13 mrj