पुणे प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ तीन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायच अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्याच दरम्यान आज शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे, तर अजित पवार यांची मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट येथे या दोन्ही नेत्यांची स्वतंत्र बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमक कोणासोबत जायचं, याबाबत राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या काल बैठका झाल्या आहेत.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकारिणीची बैठक काल पार पडली. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथून प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली असंख्य कार्यकर्ते शरद पवार यांच्या बैठकीसाठी रवाना झाले. देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, एकच साहेब पवार साहेब, आम्ही पवार साहेबांसोबत अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
आणखी वाचा-पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकांमध्ये ‘दादा’ कोण? चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवारांचे आव्हान
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, “आज पवार साहेबांच्या प्रेमापोटी शहरातील असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरी आज आमच्यासोबत आजी माजी पदाधिकारी दिसत नसले. तरी येत्या तीन दिवसात पुढील चित्र स्पष्ट होईल”, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.