लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी तातडीने आयोजित केलेल्या बैठकीकडे आमदार, माजी नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार, नगरसेवकांच्या अनुपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत राहण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला. मात्र, आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने त्यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत अजित पवार सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक अजित पवार यांना पाठिंबा देणार की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने राहणार, याबाबत चर्चा उलट-सुलट चर्चा सुरू आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ते अजित पवार यांच्यासमवेतच असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र ते अजित पवार यांच्यासमवेतच असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीकडे आमदार, नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले.
आणखी वाचा-राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी संभ्रमात… कुठे जायचे तेच कळेना?
या बैठकीत शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्या समवेत राहण्याचा ठराव करण्यात आला. त्या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, माजी नगरसेवक प्रकाश म्हस्के, रवींद्र माळवदकर, ॲड. नीलेश निकम, श्रीकांत पाटील, भगवानराव साळुंखे, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सतीश म्हस्के, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात ४३ नगरसेवक आहेत. बाबूराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, महेंद्र पठारे, सुभाष जगताप या प्रमुख नगरसेवकांसह अनेक नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख अनुपस्थित होते. त्यामुळे एक मोठा गट अजित पवार यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा होत आहे. दरम्यान, अनुपस्थित आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांच्या नावाची यादी वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात येणार आहे.
शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व असल्याचा, मुंबई येथे बुधवारी (५ जुलै) होणाऱ्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा आणि प्रदेश कार्यकारिणीने पाठविलेल्या आराखड्यानुसार प्रतिज्ञापत्र प्रदेश कार्यालयाला पाठविण्याचे ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. मुंबई येथे होणाऱ्या बैठकीसाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, त्याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे, असे जगताप यांनी सांगितले.