संध्याकाळची वेळ झाली, की कार्यालयातून घरी जाण्याची लगबग असलेल्यांची वाहने शहरातल्या सगळ्या प्रमुख रस्त्यांवर हिरिरीने एकमेकांशी स्पर्धा करत उतरतात. कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी घाई आणि घरी जाण्याचीही घाई; त्यामुळे स्पर्धा अटळ. या अटळपणाने वेढलेल्या शहरी आयुष्यात, स्पर्धा करणाऱ्या वाहनांची ओकारी आलेल्या रस्त्यांच्या कडेच्या पदपथांवर, पुलांच्या कठड्यांपाशी, बाकांवर, पारांवर, उभी असलेली, चालत असलेली, शांत बसलेली, शिणलेली, संपलेली काही माणसे दिसतात. या अटळपणाशी जणू फारकत घेऊन त्यांनी त्यांचे अस्तित्व एका शून्यात सामावलेले असते. एकदा शहरातल्या मुख्य रस्त्यांवरच्या पदपथांवर चालून बघा. आपल्याशीच बडबड सुरू असणारी किंवा नुसतीच शांत बसलेली अशी माणसे पदोपदी दिसतील. यात श्रीमंत-गरीब असा भेद नाही, वयाचीही कोणती सीमा नाही. त्यांच्याकडे पाहून दया येते, करुणा दाटते, हसू येते आणि भीतीही वाटते. ते मात्र निर्विकारपणे असतात आपल्या आपल्यातच. प्रश्न पडतो, की ही माणसे या शहराची नाहीत का? यांचे या शहराशी किंवा शहराचे यांच्याशी नाते नाही का? त्यांच्या घरी त्यांना विचारणारे कोणी नाहीत, की ज्यांनी विचारायचे, त्यांना वेळ नाही, म्हणून त्यांच्या पदरी हे अटळ एकाकीपण आले आहे… तसे पुण्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक काम करणाऱ्यांची कमी नाही. पण, सध्या मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करणाऱ्यांची गरज फार प्रकर्षाने जाणवते आहे. एकलव्य फाउंडेशन, डॉ. आनंद नाडकर्णींची आयपीएच, नुकतेच एक वर्ष पूर्ण केलेला ‘समतोल’ नावाचा बायपोलर मूड डिसऑर्डर असलेल्यांना मदत करणारा आधार गट आणि इतरही काही संस्था या क्षेत्रात काम करतात. पण, या क्षेत्रातील काम म्हणजे चार दिवस औषधे दिली आणि आजार बरा झाला, असे नाही. त्यामुळे यात सातत्याने आणि संयमाने काम करावे लागते. मुळात, ज्या व्यक्ती या गटांपर्यंत पोहोचतात, त्यांना मदत मिळू शकते. पण, ज्यांना इथवर पोहोचताच येत नाही, त्यांचे काय? काहींना स्वत:लाच माहीत नसते, की आपल्याला मानसोपचारांची गरज आहे, तर अनेकदा अशा व्यक्तींच्या आजूबाजूचे हे समजून घ्यायला कमी पडतात. उदाहरणार्थ, सारखे रडू येते, हा मानसिक आजार असू शकतो, हे काहींच्या गावीच नसते. मग अशा व्यक्तींना ‘रडके’ हे विशेषण सहजपणे चिकटते आणि सारखे रडू येणारे बिचारे आणखी गर्तेत ढकलले जातात. झोप न येणे किंवा खूप येणे, भूक अजिबात न लागणे किंवा सारखी लागणे, सारखे हात-पाय धुणे, एखादी गोष्ट अमुक इतक्या वेळेसच करणे अशा अनेक ‘सामान्य’ घटना मानसिक रोगाची सुरुवात किंवा मध्य असू शकतात, याचे अशी कृती करणाऱ्यांना किंवा अशी कृती करणाऱ्यांच्या आजूबाजूच्यांनाही भान नसते. पण, कधी या सगळ्याचे स्वत:ला संपविण्यापर्यंत टोक गाठले जाऊ शकते, त्याचे काय? इथून परत फिरण्याचा मार्ग नाही…
म्हणूनच, परत फिरण्याचा मार्ग नसलेल्या रस्त्यावर जाण्याआधीच वर उल्लेख केल्याप्रमाणे, शहरातल्या रस्त्याच्या कडेला उमटणारी ही स्पंदने नीट जाणीवपूर्वक आकळून घेणे गरजेचे. आपल्या कुटुंबातला, मित्र परिवारातला, आप्तेष्टांतला कुणी या वाटेवर नाही ना, हे पडताळून पाहणे महत्त्वाचे. आपण धावत असलेल्या स्पर्धेत ‘हे’ नाहीत, याला स्पर्धा कमी झाल्याचा आनंद मानायचा, की या स्पर्धेच्या अपरिहार्यतेतून काही जण शून्यात ढकलले गेल्याचे हे वेदनादायी प्राक्तन आहे, याची जाणीव ठेवायची, हे ज्याने-त्याने ठरवावे. पण, उद्या आपणही त्यात असू शकतो, एवढे लक्षात जरूर ठेवावे. अवाढव्य पसरलेल्या या शहरात ‘कडे’ला दिसणारी ही शून्यमनस्क माणसे हाही या शहराचा ‘साइड’ इफेक्ट आहे. त्यांना नुसते हसण्यावारी, भीती वाटून बाजूला लोटण्यावारी वा दुर्लक्ष करण्यावारी नेऊन चालणार नाही. अशी शहरी असंवेदनशील कृती ही मानसिक आरोग्याकडे बघण्याच्या आपल्या संवेदनशीलतेचे स्खलन होत असल्याचे निदर्शक असेल, हे जाणलेले बरे. आणि, म्हणजे प्रत्येक वेळी लगेच त्यांच्यासाठी जाऊन काही करायलाच पाहिजे, असे नसते. बहुतेक वेळा त्यांना फक्त समजून घेऊन हे असेही असते, एवढे जाणिवेत रुजविलेलेही पुरेसे असते. तसे एकदा झाले, की आपल्या जवळचे कुणी असे शून्यात पाहू लागले, की त्याच्या नेणिवेत काही तरी खळबळ माजली आहे, याची जाणीव आपल्याला होऊ शकते. सहकंपा म्हणतात ती हीच. ती असली, की शहरातल्या रस्त्यांवरून वाहत जाताना, कडेच्या पदपथांवर, पुलांच्या कठड्यांपाशी, बाकांवर, पारांवर उभी असलेली, चालत असलेली, शांत बसलेली, शिणलेली, संपलेली माणसे किमान पाहिली, तरी मनात खोलवर नोंद होते. एरवी फक्त एकमेकांशी स्पर्धाच करणाऱ्या माणसांनी तेवढी तरी करायला हवी!
siddharth.kelkar@expressindia.com