पुणे : गेल्या चार दशकांत झालेल्या शहरीकरणामुळे पुणे शहर आणि परिसरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण २७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गोगलगायींच्या स्थानिक नसलेल्या प्रजाती वाढत असल्याचे संयुक्त संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाढत्या शहरीकरणाचा फटका स्थानिक जैवविविधतेला बसत असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील आकाश बगाडे, डॉ. अभय खंडागळे, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथील सौरभ खंदारे, डॉ. युगंधर शिंदे, बंगळुरू येथील अशोका ट्रस्ट फॉर इकॉलॉजी अँड एन्व्हॉर्यन्मेंट येथील एन. ए. अरविंद यांच्यासह डॉ. मिहिर कुलकर्णी, डॉ. समीर पाध्ये यांचा या संशोधनात सहभाग होता. या संशोधनासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निधी देण्यात आला होता. या संशोधनामध्ये २०२१ ते २०२३ या कालावधीत पुणे आणि परिसरात गोड्या पाण्यातील गोगलगायींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून गोड्या पाण्यातील गोगलगायींच्या १६ प्रजाती आढळल्या. त्यातील तीन प्रजाती स्थानिक प्रजातींपैकी नाहीत. तसेच या तीन प्रजाती आक्रमक असल्याने स्थानिक प्रजातींसाठी त्या धोकादायक ठरत आहेत.

हेही वाचा : मतदारयादीचा भूतकाळातही ‘गोंधळ’

संशोधक आकाश बगाडे म्हणाले, की या पूर्वी १९६३ आणि १९७९मध्ये गोड्या पाण्यातील गोगलगायींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या प्रजाती आणि या पूर्वीच्या दोन सर्वेक्षणातील नोंदींची पडताळणी करण्यात आली. त्यात पुणे आणि परिसरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींच्या १६ प्रजाती आढळून आल्या, तर गोगलगायींचे प्रमाण २७ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेले नागरीकरण हे गोगलगायींचे प्रमाण कमी होण्याचे कारण असू शकते. तसेच स्थानिक नसलेल्या प्रजातींचे प्रमाण वाढल्याने स्थानिक जैवविविधतेचे, अन्न साखळीचे नुकसान होते.

गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण कमी झाले आहेत. स्थानिक जैवविविधतेचा भाग नसलेल्या काही प्रजाती या संशोधनात आढळून आल्या. या प्रजाती आक्रमक असल्याने त्यांचा स्थानिक प्रजातींना फटका बसू शकतो, असे डॉ. युगंधर शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य

जागृती करण्याची आवश्यकता

गोड्या पाण्यातील गोगलगायींच्या अभ्यासाच्या चाळीस वर्षांपूर्वीच्या चांगल्या नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, त्या काळात शहरीकरण झाले नव्हते. गेल्या काही वर्षांत झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे नाले, ओढे, नद्या, तळ्यांची हानी झाली. त्यामुळे गोगलगायींचे अधिवास नष्ट झाले. पुणे आणि परिसरात केलेल्या अभ्यासात तीन परदेशी प्रजाती आढळून आल्या. त्या अमेरिका, युरोपातील आहेत. या प्रजातींना स्थानिक शत्रू प्रजाती नाहीत. त्याशिवाय या परदेशी प्रजाती प्रदूषित पाण्यातही टिकून राहतात. घरगुती मत्स्यालयांमध्ये परदेशी गोगलगायींचा वापर केला जातो. मात्र, त्या नैसर्गिक अधिवासात सोडल्या जाऊ नयेत, याबाबत जागृती होण्याची आवश्यकता आहे. परदेशी प्रजातींमुळे स्थानिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, असे एन. ए. अरविंद यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city number of snails in freshwater decreasing may be threat for local biodiversity pune print news ccp 14 css