पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता ‘पिंक ई रिक्षा’ सेवेची भर पडली असून, पहिल्या टप्प्यात चार हजार गुलाबी रिक्षा शहरातील रस्त्यांंवर धावणार आहेत. आतापर्यंत ३,२३० महिलांनी अर्ज केले असून, १७२६ रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. या रिक्षांंसाठी प्रामुख्याने मेट्रो, बस आणि रेल्वे स्थानक, तसेच विमानतळ येथे पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्ती पेठा आणि शहराच्या गर्दीच्या भागात थांबे असणार आहेत.
सध्या शहरात सुमारे ४५ हजार रिक्षाचालक असून, शहराच्या मध्यवर्ती भागापासून पिंपरी-चिंचवड ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपर्यंत प्रवास करतात. आता चार हजार ‘पिंक ई रिक्षा’ची भर पडणार आहे. त्यांपैकी १७२६ ‘पिंक ई-रिक्षा’ रस्त्यावर सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीतील सदस्यांनी अभ्यास करून ‘पिंक ई-रिक्षा’साठी थांबे, प्रवासी दर, वाहनतळ, प्रवासाचा कालावधी, वेळापत्रक, ऊर्जा केंद्र (चार्जिंग पाॅइंट) आणि सुरक्षितता आदी धोरण निश्चित केले आहे. ही पूरक सेवा उपलब्ध झाल्याने महिलांना स्वयंरोजागर निर्माण होणार आहे.
आरटीओकडून प्राथमिक स्तरावर थांब्यांंचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्थानक, मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ, तसेच मध्यवर्ती पेठांचा भाग, डेक्कन, हडपसर, खराडी, विमाननगर, येरवडा येथे थांबे असणार आहेत. रात्री उशिरापर्यंत सेवा दिल्याने महिलांची सुरक्षितता निश्चित होणार आहे.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
३२३० महिलांचे अर्ज
शहरात चार हजार ‘पिंक ई- रिक्षा’ सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी २० ते ५० वर्षे वयोगटातील तीन हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज आले आहेत. त्यांपैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १७२६ अर्ज मंंजूर केले आहेत. महापालिकेतील ३८ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील २२ अशा एकूण ६० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रिक्षांसाठी सुमारे एक हजारापेक्षा अधिक ऊर्जा केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच या सेवेचा विस्तार करण्यात येईल.
मनीषा बिरारीस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
महामेट्रोला पूरक सेवा देण्याबाबत महिला व बालविकास विभागासोबत करार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वनाज ते चांदणी चौक, निगडी ते पीसीएमसी, वाघोली ते रामवाडी या ठिकाणच्या स्थानकांवर ‘पिंक ई रिक्षा’ची पूरक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. महामेट्रोच्या ॲपमध्ये या रिक्षा सेवेसाठी विशेष खिडकी उपलब्ध करून देण्यात येईल.
हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत असल्याचे बोलले जात असले, तरी काही क्षेत्रांत अद्याप महिला पुरुषांच्या तुलनेत कमी आहेत. पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून महिलांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्यास संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे आभार मानते. उपमुख्यमंत्री पवार यांना पहिल्यांदा रिक्षातून फिरवून आणल्याने आत्मविश्वास बळावला.
लक्ष्मी दुपधर, लाभार्थी
लाडक्या बहिणींसाठी योजना आणि त्यातच पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने मला खूप आनंद होत आहे. या योजनेमुळे आर्थिक विकास साधता येणार आहे.
पूजा कांबळे, लाभार्थी