पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुण्याला लाभला आहे. पुणे हे ऐतिहासिक वारसा, शिक्षण आणि नावीन्य यांचा संगम आहे. उत्पादन क्षेत्र आणि जागतिक पुरवठा साखळीत पुण्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळेच नवउद्यमी (स्टार्ट अप) कंपन्यांकडून या शहराला पसंती दिली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: संसदेमध्ये नवरा जाणार की मी? सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्यावर टीका

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित पाचव्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’च्या उद्घाटनपर भाषणात गोयल बोलत होते. गोयल यांनी दृक्श्राव्य माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीची संधी मिळावी, यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला विविध देशांचे वाणिज्य दूत उपस्थित आहेत.

हेही वाचा >>> मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठपदरीकरणाचा खर्च ६०८० कोटींच्या घरात, निधी उभारणीचे एमएसआरडीसीसमोर आव्हान

करोना संकटाच्या काळात लसीची निर्मिती पुण्यातून झाली. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचा जीव वाचू शकला, असे सांगून गोयल म्हणाले, की पुणे हे मोठे उत्पादन केंद्र असून, येथील जागतिक पुरवठा साखळीत ते महत्त्वाचे आहे. याचबरोबर आता ते जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे बनले आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आणि स्वयंउद्योजकांची मोठी संख्या यामुळे नवउद्यमी कंपन्यांकडून पुण्याला प्राधान्य दिले जात आहे. यंदा परिषदेत वाहननिर्मिती, अन्नप्रक्रिया आणि सायबरसुरक्षा या उद्योगांवर भर देण्यात आला आहे. या परिषदेत विविध देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली. राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली. या परिषदेचा समारोप मंगळवारी (ता. २७) होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city preferred for start up says piyush goyal pune print news stj 05 zws