कसबा आणि चिंचवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक झाली. मात्र, त्यापूर्वी नाना पटोलेंचे बैठकीसाठी काँग्रेस भवन येथे आगमन झाले असता एक मांजर त्यांच्या मार्गामध्ये आडवी जाण्याची शक्यता होती. हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची धडपड पाहण्यास मिळाली आणि त्यांची धडपड यशस्वी देखील झाली.
आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक झाली. मात्र, बैठकीपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस भवन येथे काही मिनिटांत पोहोचणार अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अरविंद शिंदे हे सहकार्यासह गेटवर जाऊन थांबले. त्यादरम्यान नाना पटोले यांचे आगमन झाले. नाना पटोले यांचे सर्वांनी स्वागत केल्यावर ते पुढे काही पावले चालत होते तेवढ्यात एक मांजर नाना पटोले यांच्या मार्गामध्ये आडवी जाण्याची शक्यता होती. हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची एकच धडपड पाहण्यास मिळाली.
हेही वाचा – “काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल”, कसबा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची माहिती
हेही वाचा – पुणे : नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना, नाट्यसंस्थांना अनुदान मिळण्याचा मार्ग खुला
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक झाली होती.