पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत तरी पावसाचा नीचांक नोंदवला गेला असून, १ जून ते १४ जुलै या दीड महिन्यांत केवळ ३०.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सरासरीनुसार या काळात पुणे वेधशाळेत तब्बल २२२.३ पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात पडलेल्या पावसाचे प्रमाण १४ टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे.
संपूर्ण राज्यातच पावसाचे प्रमाण कमालीचे कमी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही उपविभागांमध्ये अशीच स्थिती आहे. पुण्यात तर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे वेधशाळेची आकडेवारी सांगते. पुणे वेधशाळेत म्हणजे शिवाजीनगर परिसरात पुणे शहराचा पाऊस मोजला जातो. तिथे १ जूनपासून १४ जुलैपर्यंत साधारणपणे २२२.३ मिलिमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद होते. हे प्रमाण वास्तवात दरवर्षी थोडय़ा-अधिक फरकाने कमी-जास्त होत असते. या वर्षी स्थिती अतिशय विपरित आहे. प्रत्यक्षात केवळ ३०.६ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आताच्या जुलै महिन्यातही त्यात विशेष बदल झाला नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या मान्सून सक्रिय आहे. चांगला पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरणही आहे. असे असतानाही पुण्यात मात्र पावसाने फारशी हजेरी लावलेली दिसली नाही. पुढच्या काळात ही तूट भरून निघणे कठीण असते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुण्याच्या पावसाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला मानला जातो. भारतीय दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिनासुद्धा त्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या आषाढ महिनाच सुरू आहे. तरीसुद्धा पावसाचे प्रमाण आटले आहे.
पुण्यात पाऊस का नाही?
कोकण, सह्य़ाद्रीचे घाट माथे आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी सध्या पाऊस पडत आहे. कोकण व घाटांमध्ये संततधार पाऊस पडत आहे. मराठवाडय़ात मोठा वादळी पाऊस झाला. असे असले तरी पुणे शहर व आसपासच्या परिसरात अगदीच नाममात्र पाऊस पडला. याचे कारण नेमकेपणाने सांगता येणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. सध्या सक्रिय पावसाची स्थिती असतानाही पुण्याला पावसाने हुलकावणी द्यावी हे अपवादात्मक आहे, असे खोले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा