देशातल्या फ़ार थोड्या शहरांमध्ये सांस्कृतिक वातावरण भरून राहिलेलं दिसतं. पुणे हे त्यापैकी एक. बहुतेक शहरे उद्योगांमुळे केवळ रोजगार निर्मितीची केंद्रे बनत चालल्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना अशा सांस्कृतिक वातावरणाचा लाभही घेता येत नाही. उत्तमोत्तम नाटके,

कर्णसुखद की नेत्रसुखद!

म्हणता म्हणता दिवाळी आली देखील. उत्साहाने भारलेल्या या सणाला आपण कसे सामोरे जातो, हे महत्त्वाचे. आपण आता हा उत्साह अधिकाधिक आवाजी फटाके वाजवून साजरा करतो, की नेत्रसुखद अशा रोषणाईने या उत्साहाला कवटाळतो, यावर आपली संस्कृती अवलंबून असते. गेल्या काही वर्षांत पुण्यातील अनेक शाळांनी फटाके वाजवण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम काही प्रमाणात का होईना आता दिसू लागला आहे. आधीच प्रदूषणाने ग्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये फटाक्यांमुळे नागरिकांना जो त्रास होतो, त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. वाढत्या बांधकामांमुळे, या शहरांतील आभाळ निरभ्र दिसूच शकत नाही. अतिशय सूक्ष्म कणांनी भारलेले हे आभाळ आता आपल्या सवयीचे झाले आहे. पण म्हणून आपण ते त्यात काजळीची भर घालायची की ते आभाळ स्वच्छ होण्यासाठी सहकार्य करायचे, यावरून आपली मानसिकता लक्षात येते.

दरवर्षी किती कोटी रुपयांचे फटाके उडवले, यावरच जर आपला आनंद साजरा होणार असेल, तर आपल्याएवढे करंटे आपणच. फटाके आणि आवाज हे समीकरण आपल्या अंगवळणी पडूनही बराच काळ लोटला. अधिक आवाजाचे फटाके, हे आपल्या शक्तिप्रदर्शनाचे गमक असते, असे आपल्याला का वाटायला लागले, याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकताही आपल्याला कधी वाटली नाही. सूं s..s.. आवाज़ करती कुठेही, कशीही पोहोचणारी वेगवान चमनचिडी आता काळाच्या पडद्याआड गेलीही असेल, पण सुतळी बॉम्बसारखे प्रचंड आवाज करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण काही कमी झालेले नाही. गेल्या काही वर्षांत आपण कानठळ्या बसवणारे आवाज बारा महिने ऐकत असतो. आपण बहिरे होत चाललो आहोत, त्यामुळे तर आपल्याला अधिक आवाजाची गरज वाटत नसेल? माणूस काय किंवा प्राणी काय, मुळात शांतताप्रिय असतो. पण वाढत्या नागरीकरणामुळे आपले जगणे प्रचंड आवाजाच्या सान्निध्यात सुरू राहिले आहे. चोवीस तास आपण फ़क़त आणि फ़क़त विविध प्रकारचे अनेक आवाज ऐकत राहतो. त्यामुळेच असेल कदाचित, पण भयाण शांततेची आपल्याला भीती वाटू लागते.

हेही वाचा >>>मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल

या आवाजात फटाक्यांच्या आवाजाची भर कशासाठी हवी? दीपावलीचा आनंद साजरा करण्यासाठी आपण दिव्यांची रोषणाई करतो. रोषणाईचे फटाकेही त्यासाठीच. आकाशदिव्यांचे आकर्षक आकार आणि रंग जसे आपल्याला भावतात, तसेच आकाशातील रोषणाईच्या फटाक्यांची सौंदर्यपूर्ण रचनाही आपल्या मनाला भुरळ घालते. हे सौंदर्य न्याहाळणे हा मनाचा आनंद. तोही पर्यावरणपूरक असायला हवा. हवेतील प्रदूषणात कमालीची भर घालून सौंदर्य न्याहाळणे, हे कधीही अघोरीच. पण निदान कर्णकर्कश्श आवाजापेक्षा हे कितीतरी पटींनी अधिक सुखद. सौंदर्य अभिजात असायला हवे. त्यासाठी आपली दृष्टी विस्तारायला हवी. क्षणिक आवाजी आनंदापेक्षा अधिक सौंदर्यपूर्ण आनंदाचा शोध आपण घ्यायला हवा. त्यासाठी मनाच्या आत डोकवायला हवे. जगण्याच्या गुंतागुंतीतून सुटका करून घेण्यासाठी प्रचंड आवाजाची साथ मिळवण्याची गरज आपल्याला वाटत असली, तरी जाणीवपूर्वक आपण या आवाजाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला हवा.

mukundsangoram@gmail.com