पुणे : पुणे शहरात शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा २९ हजारांहून अधिक शिकाऊ, तर साडेतेवीस हजारांहून अधिक पक्के वाहन परवाने वाढल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालकांसाठी शहरात ‘आरटीओ’चा संगमवाडी येथे शिकाऊ चाचणी विभाग आहे, तर पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी आळंदी रस्ता येथील कार्यालयात आणि चारचाकीसाठी भोसरी येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ (आयडीटीआर) येथील चाचणी केंद्रात जावे लागते.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात २३ हजार ६९८ पक्के वाहन परवाने वाढले असून, एकूण एक लाख ५६ हजार पक्के परवानाधारक झाले आहेत. शिकाऊ वाहन परवानेदेखील गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा २९ हजार ४३० अधिक दिले आहेत. शिकाऊ परवान्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, यंदा एकूण तीन लाख ७ हजार ३३४ परवानाधारक असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय परवान्यात किंचित वाढ
आंतरराष्ट्रीय परवाने काढण्याच्या संख्येत फारशी वाढ झाली नसून, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत केवळ ५६ परवानाधारक वाढले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाच हजार २१० आंतरराष्ट्रीय परवाने होते. त्यात ५६ नी वाढ होऊन यंदा पाच हजार २६६ परवानाधारक झाले आहेत.
वर्ष | पक्के परवानाधारक | शिकाऊ परवानाधारक | आंतरराष्ट्रीय परवानाधारक |
२०२३-२४ | १,३२ | ९४० – २,७७ | ९०४ – ५,२१० |
२०२४-२५ | १,५६ | ६३८ – ३,०७ | ३३४ – ५,२६६ |
नवीन वाहन घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने वाहन परवान्यांमध्ये वाढ होत आहे. वाहनचालक परवाने काढत असल्याची बाब चांगली असून, ज्या वाहनचालकांनी अद्याप परवाने काढलेले नाहीत, त्यांनी परवाने काढून घ्यावेत. शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</p>