पुणे : पुणे शहर उपनगरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सहा हजारांहून अधिक वाहने आहेत. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) गेल्या वर्षभरात केवळ दीड हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असूून पालक, समाजसेवी संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खराडी येथील विद्यार्थ्यांच्या बसला आग लागलेल्या घटनेचे पडसाद नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरून प्रश्न उपस्थित करून बेकायदा वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली. त्यानंतर पुणे ‘आरटीओ’ कार्यालयाकडून वर्षभरातील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला असता अत्यंत तोकडी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – पिंपरी : चादरीत गुंडाळलेला ‘तो’ मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले

पुणे ‘आरटीओ’कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहरात शालेय वाहतूक करणारे रिक्षा, व्हॅन, बस असे अधिकृत सहा हजार ३६८ वाहने आहेत. या वाहनांची तपासणी करण्यात येत जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत केवळ एक हजार ५०३ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६०१ वाहने दोषी असल्याचे आढळून आले असून यामध्ये वाहनांचा परवाना नसणे, वाहनांमध्ये अग्निशामक यंत्रणेचा अभाव, मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या, सीएनजी तपासणी प्रमाणपत्राचा अभाव आणि अनेक त्रुटी आढळून आल्या. या वाहनचालकांवर दडात्मक कारवाई करून २१ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूुल केला आहे, तर चार वाहनचालकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळोवेळी तपासणी केली जात नाही. तसेच, शाळांचे प्रतिनिधी, वाहनचालक आणि वाहनातील ‘ताई’ (मदतनीस) यांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र याबाबत कुठलीच कार्यवाही केली जात नाही. प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी. – जयश्री देशपांडे, अध्यक्ष, पेरेंट असोसिएशन, पुणे

हेही वाचा – पुणे : अत्याचार प्रकरणात नृत्य शिक्षकाला पोलीस कोठडी, बालकांवर अत्याचार प्रकरणात दोन गुन्हे दाखल

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमानुसार वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक आहे. ही तपासणी केल्यानंतरच वाहनाचे ‘तंदुरुस्त प्रमाणपत्र’ देण्यात येते. ज्या वाहनांची तपासणी झाली नाही, त्यांची आकडेवारी सहजच निष्पन्न होत असून या वाहनांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city school student transport regional transport department pune print news vvp 08 ssb