पुणे : वेधशाळेने बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी शहरातील बहुतेक सर्वच भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. कोरेगाव पार्कमध्ये ४४.४ अंश सेल्सिअस तर वडगाव शेरीमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस आणि पाषाण, शिवाजीनगरमध्ये अनुक्रमे ४१.१ आणि ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
गुरुवारपासून शहरातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही वाढ या मोसमातील सर्वाधिक असेल, असेही वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा परिणाम गुरुवारी तत्काळ दिसून आला आहे. कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि पाषाणमध्ये या मोसमातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे, शिरुर, राजगुरु नगर, खेड, चिंचवड, डुडुळगाव, हडपसर, बल्लाळवाडी, लवळे, मगरपट्टा, तळेगाव, दौंड, पुरंदर, आंबेगाव, गिरीवन, एनडीए, बारामती या सर्व भागांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे.
हवेली, नारायणगाव, माळीण, निमगिरी, लोणावळा, भोर आणि लवासा येथ मात्र ३७ ते ३९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहरात उकाड्याचे हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, तर ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त व्यक्ती आणि लहान मुले यांनी कडक उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुणे वेधशाळेकडून करण्यात आले आहे.