पुणे : यंदा मार्चमध्ये शहरातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या दशकभरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद झाली आहे. यंदा मार्चमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या. शहरातील काही भागांमध्ये तापमानाने चाळीशीही ओलांडली.

लोहगाव येथे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते, तर शिवाजीनगर येथे ३० मार्च रोजी ३९ आणि ३१ मार्च रोजी ३९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर येथील सरासरी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सियस राहिले. ते सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियसने जास्त आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे १८८९पासूनच्या देशभरातील हवामानाच्या नोंदी आहेत. त्यानुसार शिवाजीनगर येथे २८ मार्च १८९२ रोजी ४२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या दशकभरातील मार्चमधील सरासरी तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे २०२४ मध्ये ३६.५, २०२३मध्ये ३३.४, २०२२मध्ये ३६.७, २०२१मध्ये ३६.६, २०२०मध्ये ३४.१, २०१९मध्ये ३६.७, २०१८मध्ये ३५.७, २०१७मध्ये ३५.७, २०१६मध्ये ३६, २०१५मध्ये ३३.७, तर २०१४मध्ये ३४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाची सरासरी तापमानाची नोंद गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक ठरली आहे.

‘फेब्रुवारीमध्ये शहरातील तापमानात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र, मार्चमध्ये तसे काही झाले नाही. महिनाभर कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियसने अधिक होते, तर किमान तापमान सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सियसने अधिक होते. तापमान सरासरीपेक्षा जास्त असूनही शहरात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली नाही. शिवाजीनगर येथे महिनाभरात एकदाही ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली नाही,’ असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले.

एप्रिलमध्येही जास्त तापमानाचा अंदाज

शहरात एप्रिलमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.