खडकवासला धरण क्षेत्रातून पुणे शहराला पिण्यासाठी तसेच पुणे जिल्ह्य़ात शेतीसाठी जे पाणी पुरवले जाते ते पुरेसे असल्याने तूर्त शहराच्या पाणीपुरवठय़ात तसेच शेतीसाठीच्या पाणीपुरवठय़ात कोणतीही कपात केली जाणार नसल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहराच्या पाणीपुरवठा नियोजनासाठी तसेच उन्हाळी नियोजनासाठी पालकमंत्री बापट यांनी गुरुवारी बैठक घेतली. बैठकीत धरण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा घेण्यात आला तसेच मुंढवा येथील महापालिकेच्या प्रकल्पातून शेतीसाठी किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचाही आढाव घेण्यात आला. जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीतील निर्णयांची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून ७.३० टीएमसी एवढा पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा एक टीएमसीने अधिक आहे. वर्षभर करण्यात आलेल्या पाणीबचतीमुळे पाणीसाठा एक टीएमसीने अधिक  असल्याचे बापट यांनी सांगितले. पुणे शहराला केल्या जात असलेल्या पाणीपुरवठय़ाचा विचार करता शहराला साडेचार टीएमसी पाणी लागणार आहे. तसेच शेतीच्या चौथ्या आवर्तनाला दोन टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करता शहराच्या पाणीपुरवठय़ात तसेच शेतीच्या पाणीपुरवठय़ात कोणतीही कपात करू नये, अशा सूचना महापालिकेला व पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत, असेही बापट यांनी सांगितले.
मुंढवा येथे महापालिकेने बांधलेल्या जॅकवेलमधून एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या एका भागातील जागेबाबतचा वाद न्यायालयात गेला असून सोमवारी त्यावरील सुनावणी आहे. या सुनावणीत शासनाच्या बाजूने निकाल लागला तर महापालिकेकडून एक टीएमसी पाणी छोटय़ा कालव्यात सोडले जाईल व त्या मोबदल्यात खडकवासला धरणातील पाणी शहरासाठी मिळू शकेल, अशीही माहिती बापट यांनी दिली.