पुणे : चॅम्पियन्स ट्राॅफीत भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर शहरभर रविवारी रात्री जल्लोष करण्यात आला. चौकाचौकात फटाके फोडण्यात आले. विजयानंतर डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) परिसरात तरुणाईने जल्लोष केला. राष्ट्रध्वज फडकावून तरुणाईने नृत्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले होते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सामन्याला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील सर्व रस्तावर अघोषित संचारबंदी लागू झाली होती. चुरशीची लढत होण्याची आशा क्रिकेटप्रेमींना होती. प्रत्यक्षात भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळविला. विराट काेहलीने शतक केल्यानंतर क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला. चौकाचौकात विविध सार्वजनिक मंडळांनी सामन्याचे पडद्यावर प्रशेक्षण केले होते. सामना जिंकल्यानंतर चौकाचौकात जल्लोष,तसेच कार्यकर्त्यांनी नृत्य करुन विजय साजरा केला. पेढे वाटून विजय साजरा करण्यात आला.

पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर तरुणाईने फर्ग्युसन रस्ता गाठला. दुचाकींवरुन घोषणा देत तरुणाई डेक्कन जिमखाना भागात जमली. राष्ट्रध्वज फडकावून जल्लोष करण्यात आला. सामना संपल्यानंतर डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. रात्री उशीरापर्यंत शहरात जल्लोष सुरू होता.