पर्यावरण आणि तापमानवाढ यातील बदलासंदर्भात माहिती देत त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती पोहचण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील ३० शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीमध्ये शिकणारे सुमारे २० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतील.
वनराई, असोसिएशन फॉर लर्निंग, एज्युकेशन, रीसर्च अँड ट्रेनिंग (अलर्ट) आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅड सस्टेनेबिलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, अलर्टचे रवी चौधरी, फाल्गुनी गोखले आणि ॲड. दिव्या चव्हाण-जाचक या वेळी उपस्थित होत्या.
वंदना चव्हाण म्हणाल्या, “या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वातावरण बदलासंदर्भात माहिती देत उपाययोजना करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासंदर्भात मदत पुरवली जाणार आहे. तसेच पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनवीन शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विविध उपक्रम आणि स्पर्धांद्वारे पर्यावरण, निसर्ग आणि सजीवांची काळजी घेण्याची संस्कृती विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध स्पर्धा आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.”
पुणे हवामान योद्धे निर्माण करण्यात येणार –
तसेच, “पर्यावरण बदल आणि तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा, वाढते तापमान, ढग फुटी, अतिवृष्टी, पूर, वादळे, वितळणारे हिमनग, समुद्र पातळीत वाढ, वाळवंटीकरण, जंगलातील वणवे, प्राणीजीवाला धोका आणि जगभरातील नवनवीन रोगांचा फैलाव अशा विविध संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या स्तरावर जागृती घडवून पुणे हवामान योद्धे निर्माण करण्यात येणार आहेत.” असं देखील खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे.