पुणे : गेल्या काही दिवसांत शहर आणि परिसरात वाढलेला थंडीचा जोर आता कमी होऊन किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच पश्चिमी विभोक्ष (वेस्टर्न डिस्टर्बन्स) येऊ घातला असून, २६ डिसेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला होता. किमान तापमानात सातत्याने घट होत होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे सहा अंश सेल्सियस, तर शिवाजीनगर येथे सात अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला होता. त्यामुळे दिवसाही हुडहुडी भरल्याचा अनुभव येत होता. चार दिवसांपूर्वीच यंदाच्या थंडीच्या हंगामातील आतापर्यंतच्या किमान तापमानाची नोंद झाली होती. मात्र, आता पुन्हा किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे शनिवारी शहर आणि परिसरात दाट धुके पडले होते. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार रविवारी वडगाव शेरी येथे १९.२ अंश सेल्सियस, मगरपट्टा येथे १९.१, कोरेगाव पार्क येथे १८.५, दापोडी येथे १८.३, शिवाजीनगर येथे १५.५ अंश सेल्सियस, एनडीए येथे १५.३ तापमान नोंदवले गेले आहे.

हेही वाचा…पुणे पुस्तक महोत्सवात यंदा पुस्तक विक्रीत चौपटीने वाढ; किती झाली उलाढाल?

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. पश्चिमी विक्षोभामुळे २५ डिसेंबरपासून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत अतिहलक्या ते हलक्या पाऊस पडू शकतो. तसेच ढगाळ हवामानामुळे दिवसा तापमान कमी राहून वाऱ्यांमुळे गारवा जाणवू शकतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cold spell in pune subsided with temperatures rising and light rain expected from december 26 pune print news sud 02