शहरातील वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांवर टीका सुरू असताना शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत वाहतूक शाखेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दैनंदिन कामकाज तसेच उपाययोजना याबाबतचा दैनंदिन अहवाल पोलीस उपायुक्त नवटके यांच्याकडे सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी दिले.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!
शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांसह राजकीय नेत्यांना कोंडीत अडकून पडावे लागले होते. पाच ते दहा मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक तासांहून जास्त कालावधी लागत होता. वाहतूक नियमनाऐवजी पोलीस कारवाईत व्यग्र असल्याने वाहतूक पोलिसांवर टीका करण्यात आली. वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्याने कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घेणाऱ्या तरुणाची दंडासाठी अडवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. गुरुवारी (२० ऑक्टोबर) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करण्याची वेळ आली.
या सर्व घटनांची पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यावर सोपविण्याचे आदेश दिले. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे हे पोलीस उपायुक्त नवटके यांना वाहतूक शाखेच्या कामकाजाबाबत दैनंदिन अहवाल सादर करणार आहेत.
वाहतूक नियोजनासाठी आणखी ३०० पोलीस कर्मचारी नियुक्त
शहरातील वाहतुकीची समस्या तसेच कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेत आणखी ३०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त गुप्ता यांनी घेतला आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.