शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. वाहतूककोंडी सोडविण्याऐवजी दंडात्मक कारवाई केल्यास खपवून घेतले जाणार नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. शहरातील वाहतूक नियमनास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एखाद्या भागात कोंडी झाल्यास तेथील कोंडी त्वरित सोडवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
हेही वाचा >>> मेट्रो धावली नदीखालून! पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गावर चाचणी
शहरातील ज्या भागात कोंडी होते. अशा प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमन आणि बेशिस्तांवर कारवाई करणे हे वाहतूक पोलिसांचे मुख्य काम आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाहतूककोंडी सोडविताना एखादा बेशिस्त वाहनचालक आढळल्यास त्याच्या वाहनाचे छायाचित्र काढून त्याच्याविरुद्ध नंतरही कारवाई करता येईल. वाहतूक नियमनास पोलिसांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. शहराच्या मध्य भागातील वाहतूक समस्या, तसेच उपाययोजनांबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे.शहरातील महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. अतिक्रमणांवर कारवाई केल्यास वाहतूक सुरळीत होईल. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.