पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंत्याला गजा मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ’पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात गुंडांच्या चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित होतात. पोलिसांना हे दिसत नाही का? पोलीस डोळे बंद करुन बसलेत का,’, असा प्रश्न उपस्थित मोहोळ यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, तसेच पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षणही करावे, असे मोहोळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोथरूड भागात बुधवारी (१९ फेब्रुवारी) मारणे टोळीतील गुंडांनी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोथरूड भागातील रहिवासी असलेले मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. गुंडगिरीचे समाजमाध्यमांतून केले जाणारे उद्दात्तीकरण, समाज माध्यमातील चित्रफिती, यावर मोहोळ यांनी भाष्य केले. ‘जोग हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजप कार्यकर्त्याला झालेली मारहाण म्हणून या घटनेकडे पाहता कामा नये. कुठल्याही पुणेकरांच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये. जोग यांना झालेल्या मारहाण प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना वाचविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करा,’ असे मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची हजेरी घेतली. पोलिसांनी हजेरी घेतल्यानंतर गुंडांनी समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करून दहशत माजविण्याचे काम सुरू ठेवले. पोलिसांना हे दिसत नाही का?, पोलिसांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने गुंडांचा बंदोबस्त करू, असा इशारा मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

सेनापती बापट रस्त्यावर गुंडांच्या टोळक्याने पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस आयुक्तांनी या घटनांचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

‘दादा’नंतर आता मुरलीअण्णांची टीका

शहरात वाहन तोडफोडीच्या लागोपाठ तीन ते चार घटना घडल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर टीका केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर तथा मुरलीअण्णा मोहोळ यांनी कोथरूडमधील संगणक अभियंता तरुणाला झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी आता आत्मपरीक्षण करावे, अशी टीका केली.