सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एप्रिलमध्ये घेतलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकालात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास होणे ही परीक्षा विभागाची चूक असल्याने दुरुस्ती करून पुन्हा निकाल जाहीर करण्याची मागणी नगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील आणि इतर संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे केली.
हेही वाचा >>> बांधकामे नियमित करण्याकडे नागरिकांची पाठ ; ‘पीएमआरडीए’कडे केवळ ५६६ अर्ज
विद्यापीठाने एल. एल. बी व बी. ए. एल. एल. बी. या अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली होती. पेपर योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यातही लँड लॉ २, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि कंपनी लॉ या विषयांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना १५पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत .त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत विद्यापीठाकडून चौकशी करून नक्की कोणत्या कारणांमुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले याचा खुलासा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
हेही वाचा >>>प्रशासकीय यंत्रणांचा सावळागोंधळ, चांदणी चौकातील जुन्या पुलावरील वाहतूक अचानक बंद केल्याने वाहतूक कोंडी
दरम्यान, परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या निकालामध्ये करोनापूर्व काळातील निकालाच्या तुलनेत आता संयुक्त उत्तीर्णता अर्थात कम्बाइन पासिंगमुळे ६६ टक्के आणि ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालामध्ये सध्या कोणताही बदल झालेला वाटत नाही. निकालाची टक्केवारी समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही. काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे आणि शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत परीक्षा विभाग सकारात्मक असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेकाकडे यांनी सांगितले.