पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. राज्यभरात दौरे करीत आहेत. त्याच दरम्यान राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे, याबाबत जाब विचारतांना दिसत आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेतेमंडळी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज उर्फ बंटी पाटील, प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू असताना पुणे शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी काँग्रेस भवनच्या आवारात येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा : शहरबात: समित्या आहेत, सुसंवादाचं काय?
त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी घेराव घालत, आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय असणार असा जाब विचारला. त्यावर नाना पटोले म्हणाले की, मागील दहा वर्षांच्या कालावधीत भाजपने समाजातील प्रत्येक घटकासाठी जो शब्द दिला तो काही पाळला नसून केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. तसेच हे सरकार आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे आगामी कालावधीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठा आणि ओबीसी समजाच्या आरक्षणाचा तोडगा काढेल, याबाबतची आम्ही भूमिका मांडलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd