पुणे : विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यात काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर पक्ष पातळीवर पराभवाचे आत्मचिंतन होईल, असे वाटत असतानाच काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि धुसफूस पुढे आली आहे. महिला शहराध्यक्षांंच्या कार्यालयावरून वाद उफाळला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यातील २१ पैकी पाच जागा लढविल्या. त्यामध्ये शहरातील कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघांसह ग्रामीण भागातील भोर आणि पुरंदर या मतदारसंघाचा समावेश होता. या पाचपैकी कसबा, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. मात्र, या निवडणुकीत या जागा काँग्रेसने गमाविल्या. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार किंवा आमदार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. मात्र, पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी अंतर्गत धुसफूस आणि वादच पुढे आले आहेत.
हेही वाचा : चहा आणि कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन मोलकरणीने लांबविले १६ लाखांचे दागिने
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे खडकी बोर्डाचे माजी नगरसेवक, काँग्रेस उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंडखोरी करून शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनीष यांची पत्नी पूजा आनंद या त्या वेळी महिला शहराध्यक्ष होत्या. या बंडखोरीनंतर पूजा आनंद यांना शहर काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार पूजा यांचे निलंबन करण्यात आल्याने प्रभारी महिला शहराध्यक्ष म्हणून संगीता तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तिवारी यांना तसे पत्र मिळाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी काँग्रेस भवनातील महिला शहराध्यक्षपदाच्या खोलीचा ताबा त्यांना देण्यात आला नाही. महिला शहराध्यक्षांचे कार्यालय आणि खोली अनुसूचित विभागासाठी देण्यात आल्याचे तिवारी यांना सांगण्यात आले. त्याबाबत तिवारी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली. मात्र, निवडणूक प्रचारावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शहर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केला. आता निवडणूक संपल्यावर हा वाद उफाळून आला असून, त्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा : डाॅ. बाबा आढाव यांचे उद्या आत्मक्लेश उपोषण
ऐन निवडणुकीवेळी कार्यालय मिळाले नाही. काँग्रेस भवनातील कोणत्याही खोलीत बसून कामकाज करा, असे मला सांगण्यात आले. त्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य प्रभारी नेत्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
संगीता तिवारी, प्रभारी महिला शहराध्यक्ष