पुणे : ‘सत्तेसाठी जे कोणी काँग्रेस सोडत आहेत, त्यांच्यासंदर्भात काही करू शकत नाही. मात्र, जे पक्षात आहेत तेच काँग्रेसचे शिलेदार आहेत. पक्षासाठी वेळ देणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे धोरण आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत संघटनेत फेरबदल होतील,’ असे माजी गृहराज्यमंत्री, पुण्याचे निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी येथे सोमवारी सांगितले.
शहर जिल्हा काँग्रेस समितीची आढावा बैठक सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यानिमित्ताने काँग्रेस भवनात त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अजित दरेकर, अविनाश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘राज्याच्या दृष्टीने पुणे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे पक्ष म्हणून काय करता येईल, यासंदर्भात पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने शहराचे नेतृत्व केले होते. काँग्रेसचे दायित्व जनतेशी आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आघाडी उघडण्यात येईल,’ असे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महापालिका निवडणुका कधी होतील, याबाबत संदिग्धता आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज आहे. नागरिकांच्या प्रश्नांना कोणी वाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडी म्हणून याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. मात्र निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करून महापालिकेतील गैरव्यवहार पुढे आणले जातील.
सशक्त लोकशाहीसाठी विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र आम्ही नाव देऊनही त्याकडे महायुतीकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.