पुणे : शहरात बांधकामे करत असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०५ बांधकाम प्रकल्पांची कामे महापालिकेने थांबविली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या तसेच काही नामांकित शिक्षण संस्थांच्या बांधकाम प्रकल्पांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या मध्यवर्ती पेठांसह, विविध उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणांवर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. एरंडवणा, सहकारनगर, कोथरूड, बिबवेवाडी, बाणेर, बालेवाडी, औंध, कर्वेनगर, खराडी या भागात अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. यातील अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात ‘सीपीसीबी’च्या नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले होते. बांधकाम करताना ‘सीपीसीबी’ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना गेल्या वर्षी महपालिकेने शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या आहेत. बांधकामे करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याने या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकणांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचेही समोर आले होते.

हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावर डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या आठवड्यात ‘सीपीसीबी’ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून बांधकामे करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही यामध्ये सुधारणा न झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे बांधकाम विभागाने गेल्या दोन दिवसांत शहरातील १०५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविण्याची कारवाई केली आहे.

बांधकामे करताना प्रकल्पाच्या बाजूला विशिष्ट उंचीचे पत्रे लावणे, हिरवी जाळी लावणे, ही जाळी ओलसर ठेवणे, बांधकामाचे साहित्याचे उतरविताना आणि गाडीत भरताना त्यावर पाणी मारणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने बांधकाम विभागाने शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या संघटनेला नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या.

महापालिकेने सूचना केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने बांधकाम विभागाने पहिल्या दिवशी ९१ तर दुसऱ्या दिवशी १४ बांधकामांचे काम थांबविण्याची कारवाई केली आहे. याबरोबरच परिमंडळ पाचमध्ये ६७ बांधकाम प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई रद्द करण्यासाठी महापालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – पुणे : पादचारी दिनासाठी शहरातील इतक्या चौकांमध्ये फक्त रंगरंगोटीच !

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली सर्व बांधकामांसाठी बंधनकारक आहे. या नियमावलीची पूर्तता न करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रकल्पांची कामे थांबविण्यात आली आहेत. या प्रकल्पांनी पर्यावरणविषयक नियमांची पूर्तता केल्यानंतर त्याची पाहणी करून त्यांना पुन्हा काम सुरू करण्याची मान्यता देण्यात येईल, असे पुणे महापालिकेच्या विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune construction department has become alert work of 105 projects has been stopped what exactly happened pune print news ccm 82 ssb