राहुल खळदकर rahul.khaladkar@expressindia.com
भारती विद्यापीठ भागातील एका सोसायटीच्या आवारात पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट उडाली. रहिवाशांकडून पाहणी करण्यात आल्यानंतर सोसायटीतील महिलेचा मृतदेह टाकीत सापडला. महिला टाकीत कशी पडली, असा प्रश्न उपस्थित झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला अटक करून चोवीस तासांत या गुन्हय़ाची उकल केली. अनैतिक संबंधातून विद्यार्थ्यांने तिचा खून केल्याचे पुढे तपासात निष्पन्न झाले.
मूळचा मुंबईचा असलेला अरुण साहेबराव पवार (वय २८) हा पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याचे सुनयना गणेश तमांग (वय ३५, मूळ रा. नेपाळ) हिच्याशी संबंध जुळले. सुनयना गेल्या दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त झाली होती. गणेशशी अनैतिक संबंध निर्माण झाल्यानंतर भारती विद्यापीठ भागात भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहणाऱ्या अरुणने सुनयनाला घरी आणले. सुनयना तेथे राहण्यास आल्यानंतर सोसायटीतील अन्य महिलांशीदेखील संबंध ठेवायची नाही, त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना तसेच महिलांना अरुण आणि सुनयना यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. दरम्यान, सुनयना गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर सुनयनाने माहेरी जाण्यासाठी अरुणकडे तगादा लावला होता. तिचे माहेर दिल्लीत होते.
सुनयनाने माहेरी जाण्यासाठी तगादा लावला खरा, पण तिने मागितलेली रक्कमदेखील भलीमोठी होती. तिने अरुणकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केल्यानंतर तो गर्भगळित झाला. सुनयनाचा खून करण्याचा कट त्याने रचला.
ऑगस्ट महिन्यात त्यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला. हे प्रकरण हाताबाहेर चालल्याने अरुणने तिचा काटा काढण्याची तयारी सुरू केली. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या सुनयनाचा चादरीने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह स्वत: घेऊन सोसायटीतील तळमजल्यावर आला. त्या दिवशी सोसायटीच्या टाकीतील पाणी संपले होते. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी पाण्याचा टँकर मागवून घेतला होता. टाकीचे झाकण उघडे असल्याचे पाहून अरुणने तिचा मृतदेह टाकीत टाकून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टाकीचे झाकण लावण्यासाठी आलेल्या एका रहिवाशाने पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले. घाबरलेल्या रहिवाशांनी तातडीने या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, सहायक निरीक्षक साळुंके यांनी तातडीने तपास सुरू केला. टाकीत सापडलेला मृतदेह सोसायटीतील महिलेचा असल्याचे उघड झाल्यानंतर रहिवासी भयभीत झाले. पोलिसांनी तातडीने अरुणची चौकशी सुरू केली. तेव्हा वाद झाल्यानंतर सुनयना घरातून निघून गेली असा बनाव त्याने केला.
चौकशीत अरुण पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांनी सुनयनाच्या बहीण आणि तिच्या पतीकडे चौकशी सुरू केली. तसेच सोसायटीतील रहिवाशांकडेही चौकशी केली. चौकशीत अरुण आणि सुनयना यांच्यात वाद झाला होता. ती गर्भवती असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अरुणला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. गेल्या काही दिवसांपासून सुनयनाने पैशासाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती. मी वेळोवेळी तिला काही पैसे दिले, पण तिने माझ्याकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम मला देणे शक्य नव्हते. त्यामुळे तिचा गळा दाबून खून केला, अशी क बुली अरुणने दिली, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले.