लोकमान्य टिळक यांनी रायगडावर सुरू केलेल्या शिवपुण्यतिथी उत्सवाचे आयोजन पुणे महापालिकेने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाबरोबर संयुक्तरीत्या करावे तसेच या उत्सवाला दोन लाख ९० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ही संस्था लोकमान्य टिळकांनी सन १८९५ मध्ये स्थापन केली होती. मंडळातर्फे प्रतिवर्षी रायगडावर शिवपुण्यतिथी उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. लोकमान्य स्वत: त्यांच्या सहकाऱ्यांसह या उत्सवासाठी रायगडावर जात असत. समाजात जागृती निर्माण व्हावी, पूर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण समाजाला राहावे आणि नव्या पिढीला इतिहासापासून प्रेरणा मिळावी यासाठी रायगड स्मारक मंडळाचे काम चालते. रायगडावर पुरातत्त्व खाते अस्तित्वात येण्याच्याही आधीपासून मंडळ काम करत असून मंडळातर्फे किल्ल्यावर विविध उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने राबवले जात आहेत.
यंदाचा शिवपुण्यतिथी कार्यक्रम २५ एप्रिल रोजी होणार असून ही ३३३ वी शिवपुण्यतिथी आहे. या उत्सवाच्या आयोजनात महापालिकेने मंडळाबरोबर सहभागी व्हावे तसेच या कार्यक्रमासाठी दोन लाख ९० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, असे पत्र नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सभागृहनेता सुभाष जगताप यांनी पक्षनेत्यांच्या सभेला दिले होते. तो प्रस्ताव पक्ष नेत्यांच्या सभेत मान्य करण्यात आला असून त्यानुसार अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune corp will contribute for shivapunyatithi utsav on raigad
Show comments