पुणे महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे चार हजार १६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत गुरुवारी रात्री एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी पक्षपाती, बोगस, फुगवटा केलेले, कधीही अस्तित्वात न येऊ शकणारे आणि फक्त कोथरूडसाठी तयार केलेले अंदाजपत्रक अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अंदाजपत्रकाची लक्तरे काढली.
अंदाजपत्रकावर सोमवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस झालेल्या चर्चेत ४६ नगरसेवकांनी भाग घेतला आणि बारा तास ही चर्चा चालली. राष्ट्रवादीच्या तीन-चार नगरसेवकांनी केलेली भाषणे वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांनी अंदाजपत्रकाचे वाभाडे काढले. अंदाजपत्रकातील पक्षपातीपणावर सभेत कठोर टीका झाली. तसेच अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी स्वत:ची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन फक्त कोथरूड मतदारसंघासाठी केलेली दीडशेहून अधिक कोटी रुपयांची तरतूद, विरोधी नगरसेवकांना देण्यात आलेली अत्यल्प तरतूद या मुद्दय़ांवरूनही चांदेरे यांच्यावर अनेक आरोप नगरसेवकांकडून करण्यात आले.
हरणावळ यांचे भाषण गाजले
अंदाजपत्रकावरील चर्चेला गुरुवारी हेमंत रासने यांनी प्रारंभ केला. फुगवटय़ाचे असल्यामुळे अंदाजपत्रकातील १९०० ऐवजी फक्त ९०० कोटींचीच कामे होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. हे फक्त लोकानुनयाच्या योजनांचे अंदाजपत्रक आहे, अशी टीका संजय बालगुडे केली. शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी अंदाजपत्रकावर सडकून टीका केली. त्यांचे आक्रमक भाषण चांगलेच गाजले. अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमधील फोलपणा त्यांनी दाखवून दिला. अत्यंत बोगस आणि कधीही अस्तित्वात न येणारे अंदाजपत्रक अशा शब्दांत अशोक येनपुरे यांनी टीका केली, तर डॉ. सिद्धार्ध धेंडे यांनीही टीका करताना एबीटीचे उत्पन्न नक्की किती हेच माहिती नसल्याचा आक्षेप यावेळी घेतला. सभागृहनेता सुभाष जगताप यांनी या अंदाजपत्रकाने नगरसेवकांवर उत्पन्नवाढीची जबाबदारी दिली असल्याचा मुद्दा मांडला, तर चांदेरे यांनी सर्व भागांना समान न्याय दिल्याचे अंदाजपत्रकावरील भाषणांना उत्तर देताना सांगितले.
 
कोण काय म्हणाले:-
योगेश टिळेकर- एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती आणि एक नावडती. तसाच महापालिकेत एक राजा आहे. त्याला दोन राण्या आहेत. आवडत्या राणीची मुले म्हणजे कोथरूड, बाणेर, बालेवाडी आणि नावडतीची मुले म्हणजे आमचा कोंढवा, हडपसर, मुंढवा. तेवीस गावे आली तेव्हाही आमच्या भागाची मुले नावडतीची ठरली आणि आता आणखी अठ्ठावीस गावे महापालिकेत येणार आहेत. मी प्रार्थना करतो की, ही अठ्ठावीस मुले आवडतीच्या पोटी जन्माला येऊदेत.
अशोक हरणावळ- मला वाटले होते की, हे अंदाजपत्रक दादा-बाबांचे असेल; पण हे तर बाणेर-बालेवाडीचे अंदाजपत्रक निघाले.
अरविंद शिंदे- टीकेच्या प्रत्येक मुद्दय़ाचा ‘पण मी अधिकचं काही बोलणार नाही..’ या वाक्याने शेवट करत शिंदे यांनी आयुक्तांच्या तसेच चांदेरे यांच्या अंदाजपत्रकाची चांगलीच चिरफाड केली. त्यांनी घेतलेले अनेक आक्षेप बिनतोड होते आणि प्रत्येक मुद्दय़ाचा त्यांनी केलेला ‘पण मी अधिकचं काही बोलणार नाही’ हा शेवट मोठीच दाद मिळवून जात होता. त्यांनी पण.. शब्द उच्चारताच अन्य नगरसेवक मी अधिकचं काही बोलणार नाही.. असे उत्स्फूर्तपणे म्हणत होते.
अश्विनी कदम- अत्यंत निराशाजनक अंदाजपत्रक. महापालिकेत आणि सभागृहात माणसे बघून विकासकामे व वर्गीकरणे होतात, हा अनुभव सातत्याने येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune corporations budget of rs 4167 cr for 2013
Show comments