डॉ. सतीश देसाई
(डॉ. सतीश देसाई हे दोनदा नगरसेवक, तर एकदा स्वीकृत नगरसेवक होते. )
मी १९८० मध्ये उपमहापौर होतो. दिवस अनंत चतुर्दशीचा. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी दहा वाजता मंडईमध्ये टिळक पुतळ्यापाशी आम्ही जमलो होतो. मिरवणूक सुरू होण्याची वेळ आली तरी महापौर सुरेश तौर मंडईमध्ये पोहोचू शकले नाहीत. महापौरांवर मात करण्याची हीच संधी आहे हे ध्यानात घेऊन अनेकांनी मला कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू करण्याची सूचना केली. १५ मिनिटे वाट पाहून झाल्यावर अखेरीस मी पुष्पहार अर्पण केला आणि मिरवणूक सुरू झाली. गणपती बेलबाग चौकात आला तेव्हा महापौर तेथे पोहोचले होते. मिरवणूक सुरू झाल्याचे पाहून त्यांनी माझ्या निषेधाचे पत्रक काढले. मात्र, या घटनेमुळे विसर्जन मिरवणूक सुरू होत असताना भोंगा वाजवायचा हा धोरणात्मक निर्णय झाला. हा भोंगा सुरू होण्याला मी कारणीभूत झालो.
मंडईमध्ये १९७९ मध्ये मी दवाखाना सुरू केला. तेव्हाचा वॉर्ड क्र. २८ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला होता. त्यामुळे अण्णा जोशी हे सलग दोनदा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले होते. तिसऱ्या वेळी ते जनता पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात लढणार का, असे मला वसंतराव थोरात यांनी विचारले. मी गमतीने त्यांना ‘हो’ असे सांगितले. एक तर, यानिमित्ताने माझे नाव त्या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातील काही नागरिक माझ्याकडे औषधासाठी येतील इतकाच माझा संमती देण्यामागचा हेतू होता. अर्थात मी नागरी संघटनेतर्फे उभा राहिलो होतो. मतविभाजनाचा फायदा होऊन अण्णा जोशी यांना त्याचा लाभ होऊ नये यासाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे अण्णा आणि मी अशी थेट लढत झाली. मतदारांनी केवळ अण्णा नकोत म्हणून त्यांच्याविरोधात केलेल्या मतदानामुळे मी विजयी झालो. खो-खो खेळातील छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू आणि वैद्यकीय व्यवसाय करणारा एवढीच माझी ओळख असली तरी राजकीयदृष्टय़ा मी नवखा होतो. माझ्या शेजारच्या वॉर्डामध्ये दत्तोपंत मेहेंदळे यांच्याविरोधात कबड्डीमध्ये छत्रपती पुरस्कारविजेता अरुण वाकणकर उभा होता. छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे महापालिकेत काय काम, अशी टीका त्या वेळी काका वडके यांनी आमच्यावर केली होती. मंडई भागातील ताई आगाशे यांनी या निवडणुकीत माझा प्रचार केला होता. त्यांचे संपूर्ण घर हे संघविचारांचे होते. माझा प्रचार केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये वितुष्ट आले. माझा विजय झाल्यानंतर ताई महापालिकेमध्ये आल्या आणि भावाला जवळ घ्यावे तशी त्यांनी मला जवळ घेऊन मिठी मारली.
काँग्रेसच्या तिकिटावर मी १९९२ मध्ये उभा होतो. त्या वेळी इच्छुक असलेले बाळासाहेब मारणे अपक्ष होते. तर, भाजपतर्फे विजय गंजीवाले यांनी निवडणूक लढविली होती. मारणे यांच्या बाजूने गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते असले तरी मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला. १९९४ मध्ये मी कसब्यातून विधानसभा लढविली होती. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे गिरीश बापट यांचा विजय झाला. मात्र, त्यानंतर मी महापालिका निवडणूक लढविली नाही. २००२ मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षाने संधी दिली.
( शब्दांकन- विद्याधर कुलकर्णी)