महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज (१६ डिसेंबर) ते पुण्यातील केसरी वाडा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले. बैठक घेऊन परतत असतानाच गर्दीतून एक जोडपं पुढे आलं आणि त्यांनी आपल्या लहान मुलाचं नाव ठेवण्याचा आग्रह ठरला. यावर सुरुवातीला राज ठाकरे यांनी हात जोडले आणि माझ्याकडून नाव नको असं म्हणत नाव ठेवण्यास नकार दिला. मात्र, या जोडप्याने पुन्हा पुन्हा आग्रह केल्यानं अखेर राज ठाकरे यांनी या मुलासाठी ‘यश’ असं नाव सुचवलं.
“मुलाचे नाव राज ठाकरे यांनी ठेवावं ही इच्छा पूर्ण झाली”
या चिमुकल्याच्या वडिलांचे नाव निशांत कमळू असं आहे. ते मनसेचे परभणीचे कार्यकर्ते आहेत. ते म्हणाले, “मी वयाच्या 17 व्या वर्षा पासून मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझा कडे मनसेच्या परभणी विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव पद आहे. माझी इच्छा होती की माझा मुलाचे नाव राज ठाकरे यांनी ठेवावं आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांनी यश हे नाव दिले असून ते आपल्याला अतिशय आवडले आहे.”
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच ते मतदारसंघानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यात ते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवतानाच उमेदवारांचीही चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ पाहा :
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात मनसेला एक झटकाही बसला. मनसेच्या धडाडीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेतील आपल्या पदांचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केलाय. यानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार यावरून चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता त्यांनीच सूचक ट्वीट करत त्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं स्पष्ट केलंय.
हेही वाचा : राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच मनसेला मोठा झटका, रुपाली पाटलांचा राजीनामा
राज ठाकरेंचा दुसर्या दिवशीचा (१६ डिसेंबर) पुणे दौरा
राज ठाकरे शुक्रवारी (१६ डिसेंबर) सकाळी ९ ते ११ या वेळेत कसबा मतदार संघातील केसरीवाडा येथे असतील. नारायण पेठ १२ ते २, पर्वती मतदारसंघात एकनाथ सभागृह (बिबवेवाडी) येथे सायंकाळी ४ ते साडेपाच, कॅन्टोन्मेंट मतदार संघात नंदी कॉल मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर (ताडीवाला रोड) सायंकाळी ६ ते साडेसात या वेळेत असतील. याशिवाय वडगाव शेरी मतदारसंघात सरगम हॉटेल (गुंजन टॉकीजजवळ, नगर रोड, येरवडा) येथेही ते जातील.