पुण्याच्या म्हाळुंगेमध्ये जमिनीच्या वादातून चुलत भावाने चुलत भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. अर्जुन कावडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कावडे यांची वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. जमिनीवरून संशयित आरोपी आणि अर्जुन यांच्यात वाद होता. जमिनीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. त्याची सुनावणी आज १३ फेब्रुवारी रोजी होती. यासाठी अर्जुन कावडे हे बुधवारी मुंबईतून म्हाळुंगेच्या दिशेने येत होते. दरम्यान त्यांना मध्यरात्री आसखेड परिसरात गाठून त्यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांना सुनावणीला पोहचू दिलं नाही. याप्रकरणी अर्जुन कावडे यांच्या चुलत भावाला म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

२०२२ मध्ये अर्जुन कावडे यांना चुलत भावाने बेदम मारहाण केली होती. हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी अर्जुन कावडे यांनी आठ एकरपैकी दोन गुंठे जागा विकली होती. यावरून देखील त्यांच्यात वाद झाले होते. जागा विकण्याला चुलत भावाचा विरोध होता. याचा राग मनात धरून त्याने हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेप्रकरणी म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्येच्या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Story img Loader