अहो साहेब, आमचं नाव ऑनलाईन रजिस्टर झालंय, पण तारीख दाखवत नाही. आमचा नंबर घ्या ना प्लिज…, अशा तक्रारी विनवण्या सुरू होत्या पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर. १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी आजपासून (१ मे) लसीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी झटपट ‘कोविन’वर नाव नोंदवत लसीकरण केंद्रावर धाव घेतल्याचं बघायला मिळालं. मात्र, नाव नोंदणी झाल्यानंतर येणाऱ्या मेसेजची वाट न बघताच लसीकरण केंद्रावर लोकांनी गर्दी केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चक्क पोलिसांना पाचारण करावं लागलं.

राज्यात आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पण अनेक लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयाबाहेर दिसून आली. ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे. अशांना नियमानुसार cowin app वर रजिस्टर करावे लागत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याच्या घोषणेच्या दिवसापासून, cowin app वर रजिस्टर करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक नागरिकांना, आज पहिल्याच दिवशी समस्यांना सामोरं जावं लागलं.

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यात अनेक नागरिक नाव रजिस्टर करूनच लस घेण्यासाठी आले होते. तारीख देण्यात आली नाही, असं सांगत नागरिकांनी सकाळपासून लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली. ‘नाव रजिस्टर झालंय, तारीख सांगितली नाही… आमचा नंबर घ्या, अशा विनवण्या करताना लोक दिसले. त्यामुळे अनेक प्रश्नांचा सामना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागला. ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्टर झाले असेल आणि आजची तारीख असणार्‍या नागरिकांना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पण, नागरिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले. सरकारचं नियोजन नसल्याने अशा प्रकारांना सामोरं जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.

Story img Loader