पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारातून आरोपी पसार होण्याच्या घटना, रुग्ण आणि नातेवाईकांमधील वाद, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. रुग्णालयाच्या आवारातील पोलीस चौकी काही वर्षांपूर्वी बंद पडली होती.

ससून रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातून रुग्ण, तसेच त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात. पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर गुन्ह्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी, तसेच उपचार ससून रुग्णालयात करण्यात येतात. रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांची गर्दी होती. ससून रुग्णालयात कारागृहातील कैद्यांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. रुग्णालयाच्या आवारातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोनची विक्री करत असल्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. ससून रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी नातेवाईक वाद घालतात, तसेच वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे.

ससून रुग्णालयाचे आवार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. यापूर्वी ससूनच्या आवराात एखादी घटना घडल्यास बंडगार्डन पोलीस ठाण्यातील कर्मचारी तेथे येत. ससूनच्या आवारात पूर्वी चौकी होती. गेल्या काही वर्षांपासून ही चौकी बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस चौकी सुरू झाल्यास ससूनमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना आधार मिळणार आहे.